
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकर्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत नवीन शासन निर्णय म्हणजेच जी आर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यासाठी पंधराशे कोटी रूपयांचा निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील सुमारे 241 कोटी रुपयांचा समावेश आहे.
या कालावधीत नगर जिल्ह्यात 190470. 33 हेक्टर बाधित झाले होते. याचा फटका तब्बल 2 लाख 92 हजार 751 शेतकर्यांना बसला. आता या निर्णयामुळे या बाधित शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
सन2022 च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधी मागणीच्या प्रस्तावावरील बाधित शेतकर्यांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण पंधराशे कोटी रुपये इतका निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. हा मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करून नये यासाठी जिल्हाधिकार्यांनी सर्व बँकांना सूचना द्याव्यात असेही निर्देश देण्यात आले आहेत.