अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या

लाल निशाण पक्षाची मागणी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मागील वर्षीच्या दुष्काळानंतर यावर्षीची दिवाळी चांगली होईल या आशेने राबणार्‍या शेतकर्‍यांच्या दिवाळीवर अतिवृष्टीमुळे विरजण पडले आहे.

गेल्या काही दिवसांत राज्याच्या बहुतांशी भागात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे शक्य तितक्या तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी लाल निशाण पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील एस.एस. खटोड अँड सन्स फार्म मालुंजा व राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील डाकले फार्मच्या सरप्लस ठरलेल्या जमिनी कसणारे भूमिहीन शेतमजूर व तत्कालीन फार्म वरील कर्मचारी व कर्मचार्‍यांचे वारस हे सन 1985 पासून अनधिकृतपणे जमीन कसत आहेत.

दरवर्षी पीक पाहणीचे अर्ज केले जातात परंतु त्यांची सातबारा सदरी नोंद केली जात नाही. त्यामुळे सदर भूमिहीन शेतमजुरांना शासनाच्या विविध योजनांचे फायदे मिळत नाहीत. त्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन पिके करावी लागतात. आणि अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीमुळे जमीन नापीक झाल्यास त्यांना शासनाची कुठल्याही प्रकारची मदत होत नाही.

अशा जमीन कसणार्‍या शेतमजुरांना शासनाच्या धोरणानुसार पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी . तसेच वर्षानुवर्षे जमीन कसत असलेल्याना शेतीसाठी शासनाच्या असलेल्या योजनांचे फायदे देण्यात यावेत यामुळे त्यांची खाजगी सावकारकीतून सुटका होईल.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून भरपाई द्यावी व राज्यातला अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करावी. यासाठी या नुकसानीचे शक्य तितक्या तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी लाल निशाण पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. बाळासाहेब सुरुडे व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके, सरचिटणीस कॉ. जीवन सुरूडे, कॉ.श्रीकृष्ण बडाख, कॉ. मदिना शेख, कॉ. शरद संसारे, कॉ. उत्तम माळी, कॉ. प्रकाश भांड, कॉ. लखन डांगे, रामा काकडे, आसरू बर्डे, अनिल बोरसे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com