अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी - वैभव पिचड

वैभव पिचड
वैभव पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तातडीने सरसकट भरपाई मिळावी, अशी मागणी माजी आमदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभवराव पिचड यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे पत्रान्वये केली आहे.

श्री. पिचड म्हणाले, अकोले तालुक्यात गेल्या 16 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे आदिवासी भागातील सर्व भात रोपे पाण्यात वाहून गेलेली आहेत. भात रोपांचे शेत पाण्याने पूर्णपणे भरलेले आहे, शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ही पिके सडून गेलेली आहेत. तसेच काही ठिकाणी शेतामध्ये भाताची लागवड केलेल्या होत्या परंतु शेताचे बांध फुटल्याने सर्व भात पिके पाण्याने वाहून गेलेली आहेत.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे 75 टक्के भरलेले असून तालुक्यातील सर्व छोटी-मोटी धरणेही पूर्णक्षमतेने भरलेली आहेत. तालुक्यामध्ये सरासरी 105 टक्के मिली पाऊस झाल्याने तालुक्यातील पूर्व भागातील बाजरी, कांदे, सोयाबीन, टॉमॅटो, बटाटे इत्यादी पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. सर्व शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. यामुळे शेतकर्‍यांना मदतीची नितांत गरज आहे.

अकोले तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पिकांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून तातडीने सरसकट भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी आ. पिचड यांनी पत्राद्वारे केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com