
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी फक्त श्रीरामपूर वगळता सर्व तालुक्यांतील शेतकर्यांना नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मिळाली आहे, परंतु श्रीरामपूर तालुक्यातील 54 गावांमध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊनही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांनी काल श्रीरामपूर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकर्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत जमा करावी, अन्यथा काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयाचे कामकाज बंद पाडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सततचा पाऊस, गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकयांचे लिंक अपडेट्स करून 15 दिवसांपर्यंत डेटा पूर्ण करून लवकरात लवकर नुकसान भरपाई खात्यात जमा होईल, यासाठी प्रयत्न करू, असे लेखी आश्वासन तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी दिले. माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
श्रीरामपूर तालुक्यातील 54 गावांमध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस व गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाने शेतकर्यांचे भाजीपाला, फळबागा यांचे पंचनामे करूनही शासनाने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्यांना अद्याप नुकसान भरपाई दिली नाही, यापुर्वीही तहसील कार्यालयासमोर नुकसान भरपाई मिळण्यासाठी वारंवार आंदोलने करुन निवेदने दिली आहेत, त्यावर शासनाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. उलट सध्या उन्हाची तीव्रता असल्यामुळे जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी श्रीरामपूर वगळता सर्व तालुक्यात शेतकर्यांना नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मिळाली आहे. यातून श्रीरामपूर तालुक्याला वगळण्यात आले आहे.
तालुक्यात पाण्याची पातळी घटली आहे. शेती मालाला भाव नाही, तसेच साखर कारखान्यांकडून पेमेंटही अद्याप झालेले नाही. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेला आहे, शेतकर्यांजवळ जमिनीची मशागत, पेरणी करण्यासाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. शेतकरी शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची वाट बघत आहे, त्यामुळे शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन शेतकर्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत जमा करावी अन्यथा काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयाचे कामकाज बंद पाडण्याचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अशोक कानडे यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, राजेंद्र कोकणे, विष्णूपंत खंडागळे, सचिन जगताप, कार्लस साठे, मुरली राऊत, रमेश सांगळे, हरिभाऊ कतोडे. निखिल कांबळे, अशोक भोसले, अॅड. मधुकर भोसले, गणेश कांबळे, सचिन पोखरकर, रामभाऊ पवार, बाळासाहेब तनपुरे, दीपक कदम, सुनील कवडे, गणेश आदिक, अमोल आदिक, निलेश आदिक आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.