भर उन्हातच सुटते जिल्हा परिषदेची शाळा ; विद्यार्थ्यांचे हाल

भर उन्हातच सुटते जिल्हा परिषदेची शाळा ; विद्यार्थ्यांचे हाल

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

सध्या सूर्य आग ओकतोय, सकाळी नऊ नंतर घराच्या बाहेर निघणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा भर उन्हात दुपारी साडेबारा वाजता सुटत असल्याने विद्यार्थ्यांना घरी जाताना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हामुळे काही झाले तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न सध्या पालकांमधून उपस्थित होत आहे.

1 एप्रिलपासून जिल्हा परिषदेने सकाळी 7 ते दुपारी साडेबारा ही प्राथमिक शाळेची वेळ निश्चित केली आहे. आठ दिवसांपासून तापमान दररोज वाढत आहे. दुपारी सर्व रस्ते उन्हामुळे ओस पडल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र भर उन्हात दुपारी साडेबारा वाजता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची सुटण्याची घंटा वाजते. त्यावेळेस ऊन मी म्हणत असते. अनेक विद्यार्थ्यांच्या पायात चप्पल, डोक्यात टोपी नसते. अशा परिस्थितीत भर उन्हात विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खात घरी जावे लागत आहे.

ही परिस्थिती फार भयावह आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रास झाला तर जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आता पालक वर्गातून उपस्थित होत आहे. यापेक्षा पहिली रेग्युलर शाळा बरी होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलेले आहे. विद्यार्थ्यांनी घरून पाणी आणले तरी ते गरम होऊन जाते. सकाळी सातला शाळेत जायचे म्हणजे सगळ्यांना घरून डबा करून मिळतोच असे नाही. त्यात शालेय पोषण आहाराबाबत न बोललेलेच बरे. जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मुले बहुंताश ही गोरगरिबांचे व ग्रामिण भागातील असतात त्यांचे आई-वडील कोणी शेतात राबत असतात तर कोणी मोलमजुरी करतात.

त्यामुळे मुंलांना शाळेतून घरी न्यायला ना रिक्षा असते ना स्कूलबस शहरासारखी परिस्थिती खेड्यात नसते. पाठीवरचे दप्तर डोक्यावर घेऊन चालावे लागते. भर उन्हात घरी जाताना विद्यार्थ्यांना काही त्रास झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकांसह सर्वांनाच सध्या पडला आहे. अधिकार्‍यांनी एसीत बसून निर्णय घेण्याअगोदर जर प्रत्यक्ष फिरून पाहिले असते तर भर उन्हात साडेबारा वाजता शाळा सोडण्याचा निर्णय त्यांच्याकडून झाला नसता, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.

Related Stories

No stories found.