
देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara
सध्या सुरु असलेल्या उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे इयत्ता 5 वी ते 9 वीची शाळेची सध्या सुरु असलेली सकाळी 7:30 ते दुपारी 12: 30 या वेळेत बदल करुन ही वेळ दुपारी 12:30 ऐवजी 10:30 ते 10:45 अशी करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. याबाबत शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने बदल करावा, अन्यथा याबाबत पालकांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पालकांच्या वतीने देण्यात आला आहे.
उष्णतेचा पारा 44 अंशावर गेला असताना दुपारी साडेबारा वाजता तळपत्या उन्हात मुलांची शाळा सोडण्यात येत आहे. शाळा सुटल्यानंतर रणरणत्या उन्हात वाड्यावस्त्यावरील लहान मुलामुलींना घरी जावे लागते. काही सायकलवर तर काहींना पायी जावे लागते. यामुळे मुलांची पुरती दमछाक होऊन उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उन्हामुळे अनेक मुले तापाने फणफणली आहेत. अनेकांना डोकेदुखीसारखे आजार सुरु झाले आहेत. यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
त्यामुळे भरदुपारी शाळा सोडण्याचा निर्णय हा लहान मुलांवर अन्यायकारक असल्याचे पालकांचे मत आहे. वास्तविक पाहाता इयत्ता पाचवी ते नववीच्या मुला मुलींसाठी सकाळी साडेसात ते सकाळी पावणेअकरा किंवा साडेदहाची वेळ योग्य आहे. याबाबत शिक्षण विभागाने गांभीर्याने विचार करुन तातडीने निर्णय घेऊन शाळेच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही पालकांनी दिला आहे.
एसीमध्ये बसून शिक्षण अधिकार्यांना उन्हाच्या झळा काय समजणार? त्यांनी स्वतः शाळा सुटण्याच्या वेळेत शाळेच्या मैदानावर उपस्थित राहून उन्हाची तिव्रता बघावी तेव्हा त्यांना खरी उष्णतेची धग कळेल. आज मुले सायकल वर शाळेत येतात. मात्र, प्रत्येक शिक्षक चारचाकी एसी गाडीतून शाळेत येतात. त्यामुळे त्यांना देखील उष्णतेची धग जाणवत नाही. मरण होते ते फक्त लहान मुलांचेच! म्हणूनच शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.