आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न - केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार

आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न - केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार

निमगावजाळी |वार्ताहर| Nimgav Jali

आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य सुविधांना बळकट करतानाच, आरोग्य वर्धिनीच्या माध्यमातून दुरस्थ पद्धतीने आरोग्य सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर विकसीत करुन प्रत्येक नागरीकाला घराजवळच आरोग्य सुविधा देण्याची संकल्पना अधिक सक्षम करण्यावर केंद्र सरकारने भर दिला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर दि. 18 ते 22 एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात हेल्थ मेळावे आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या आरोग्यवर्धीनी दिवसाचा चौथा वर्धापन दिन देशभरात आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्यासह आरोग्यविभागाचे वरीष्ठ अधिकारी डॉक्टर्स व्हिडीओ दूरदृष्यपद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिर्डी विधानसभा मतदार संघातील निमगावजाळी येथे प्राथमिक आरोग्यकेंद्रात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत हा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, जि.प.सदस्या अ‍ॅड. रोहिणीताई निघुते, अ‍ॅड. अनुराधा येवले, जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुरेश घोलप, निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. तैय्यब तांबोळी यांच्यासह माजी उपसभाती मच्छिंद्र थेटे, सरपंच अमोल जोंधळे यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका याप्रसंगी उपस्थित होत्या. शिर्डी विधानसभा मतदार संघाच्यावतीने सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी मंत्री पवार यांचे स्वागत केले. मंत्री पवार यांनी सर्व आरोग्य अधिकारी, आशासेविकांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2018 सालापासून ही योजना सुरु करण्यात आली होती. प्रत्येक माणसाला घराजवळच उपचार आणि औषधे मिळावीत हा या योजनेचा हेतू आहे. त्यामुळे आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्य सुविधांना बळकट करण्याचे काम संपूर्ण देशभरात सुरु झाले आहे. आज चौथा वर्धापन दिन साजरा करताना, देशातील प्रत्येक नागरीकाला आता प्राथमिक उपचार ई-संजीवनीच्या माध्यमातून मिळावेत तसेच पुढील तपासण्यांसाठी चांगल्या डॉक्टरांकडून उपचारांचे मार्गदर्शन टेलीकन्सल्टनेशच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर बाबत माहिती देताना, डॉ. भारती पवार म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून देशाच्या इतिहासात प्रथमच उपचारांबरोबरच रुग्णांना योगा तसेच इतर व्यायाम प्रकारांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी काम सुरु झाले आहे. देशातील एक लाख केंद्रांमधून या सुविधा सुरु करण्यात आले असून, तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या आरोग्य सुविधेचा एक भाग म्हणून संपूर्ण देशात आणि राज्यात 18 ते 22 एप्रिल दरम्यान हेल्थ मेळावे गावपातळीवर आयोजित केले असल्याचे स्पष्ट करुन या शिबीरांच्या माध्यमातून सर्व उपचारांबरोबरच ऑपरेशनची सुविधाही नागरीकांना देण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत योजना, जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांना या शिबीराच्या माध्यमातून कार्डवाटपही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

देशात कोव्हीड रुग्णांची वाढती संख्या विचारात घेवून निर्बंधांच्या बाबतीत केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. राज्यांनी त्यांच्याच स्तरावर याबाबतचे निर्णय करायचे आहेत. सर्व सन आणि उत्सव साजरे करताना नियमांचे पालन कठोरपणे व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी जि.प.माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून उच्चदर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र सरकारने सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी मंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com