संगमनेर |वार्ताहर|Sangmner

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधऩ व प्रशिक्षण परिषद

नवीदिल्ली यांच्यावतीने आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणात राज्यातून सुमारे आठ हजार शिक्षकांनी सहभाग घेतला आहे. अहमदनगर जिल्हयातील केवळ 222 मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदविला आहे.

शालेय शिक्षणात कार्यरत असलेले मुख्याध्यापक, तसेच प्रभारी मुख्याध्यापक व भविष्यात जे शिक्षक मुख्याध्यापक होऊ शकणार आहेत अशा सर्व शिक्षकांकरिता केंद्रीय शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवीदिल्ली यांच्यावतीने ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

सदरचे प्रशिक्षण हिंदी व इंग्रजी असल्याने त्याचा अनुवाद राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांनी केला आहे. त्यासंदर्भातील माहिती व ध्वनी चित्रफिती संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यासाठी मिपा संस्थेच्यावतीने राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाचे शिक्षक देखील हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार आहेत.

यासाठी राज्य स्तरावरून व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्यावतीने स्थानिक प्रशासनाला कळविण्यात आले आहे. मात्र राज्यभरातून या प्रशिक्षणास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ग्राह्य धरा

राज्यात सध्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण होत नाहीत. शासनाने यापूर्वी प्रशिक्षणांची गरज नाही असा शासन निर्णय घेतला होता. तथापी पुन्हा प्रशिक्षण सक्तीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी वित्त विभागाची परवानगी न घेता आदेश काढण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सध्या प्रशिक्षण पुन्हा घेतली जावीत अशी भूमिका आहे.त्या बाबत शासन स्तरावरून प्रयत्न होत आहेत.पूर्वी 21 दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य होते. त्याऐवजी ते दहा दिवसांचे ऑनलाईन करावे, अशी मागणी शिक्षक आमदारांनी केली आहे. त्यामुळे सध्या सरकारच्यावतीने सुरू असणारी प्रशिक्षणे ही वरिष्ठ निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरावीत, अशी मागणी पुढे आली आहे. तसे धोरण घेतल्यास मोठ्या संख्येने शिक्षक देखील सहभागी होऊ शकणार आहेत.

असा आहे अभ्यासक्रम

या प्रशिक्षणासाठी शालेय नेतृत्व एक दृष्टीक्षेप, स्वच्छ विकास, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे परिवर्तन, संघ बांधणी आणि नेतृत्व, नवोपक्रमाचे नेतृत्व, भागिदारीचे नेतृत्व, शालेय प्रशासनाचे नेतृत्व, शाळा विकास आऱाखड्याची रचना व संकलन असे आठ घटकसंच निर्धारित करून देण्यात आले आहेत. त्यासाठी वाचन साहित्य, ध्वनीचित्रफिती देखील संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे सदरच्या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक नेतृत्व करू पाहणार्यांना निश्चित मदत होणार असून त्या प्रशिक्षणातून शाळांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी दिशा मिळणार असल्याचे काही प्रशिक्षणार्थींनी सांगितले. प्रशिक्षण घटक संच पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन मूल्यमापनाला सामोरे जावे लागत आहे.

नव्या धोरणाप्रमाणे प्रशिक्षण सक्तीचे

केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती बदल अपेक्षित आहे. त्या धोरणाप्रमाणे शिक्षकांची प्रशिक्षणे आणि माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वाढणार आहे.धोरणात शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी दरवर्षी सुमारे पन्नास तास घड्याळी ऑनलाईन प्रशिक्षण करावे लागणार आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्यावतीने विविध अभ्यासक्रमांचे घटकसंच प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भविष्यात शिक्षकांना या स्वरूपाच्या प्रशिक्षणांची तयारी दाखवावी लागणार आहे.

राज्यात सुमारे आठ हजार शिक्षक

राज्यात एक लाखाहून अधिक शाळा आहेत. त्या प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक, उपमुख्यध्यापक, पर्यवेक्षक कार्यरत आहेत. त्याचबरोबर भविष्यात अनेक शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून संधी मिळू शकणार आहे. अशा सर्वांना हे प्रशिक्षण करणे आवश्यक करण्यात आले आहे. तथापि या आवाहनाला राज्यातून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले असून राज्यात 7869 शिक्षकांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यात नागपूर 658, जळगाव 559, मुंबई उपनगर 535, सातारा 542, पुणे 445 शिक्षकांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातून 222 शिक्षकांनी नोंदणी केली आहे. सर्वात कमी नोंदणी वर्धा 48, वाशिम 56, कोल्हापूर 66, अकोला 73, जळगाव 80 अशी नोंदणी झाली आहे.