
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील शैक्षणिक कामांना गती देण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मुख्याध्यापक, पदवीधर, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी यांना 31 मे पूर्वी पदोन्नती देण्यात यावी, गैरसोय होऊ नये म्हणून अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे 2022- 23 च्या संचमान्यतेनुसार समायोजन करावेत, शासनाच्या बदली प्रक्रियेनुसार बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, 2019-20 साली झालेल्या बदली प्रक्रियेत विस्थापित शिक्षकांची फेरसुनावणी घेऊन त्यांना पदस्थापना मिळावी, पदवीधर शिक्षकांचे वेतन सेवेत आलेल्या उपाध्यापकांपेक्षा कमी आहे. पदवीधर शिक्षकांच्या वेतननिश्चीतीतील त्रुटी व तफावती दूर करून त्यांचे वेतन समान असावे, तसेच मार्चअखेर प्रत्येक वर्षी शिक्षकांचे सेवापुस्तके अद्ययावत केल्याचे प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून मिळावे, अशी मागणी आ. सत्यजित तांबे यांनी केली.
सोमवारी जिल्ह्यातील शैक्षणिक प्रश्नावर आ. तांबे यांच्या उपस्थितीत झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्यात बैठक झाली. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षणात जर नगर जिल्ह्याला अव्वल ठरवायचे असेल तर शिक्षण विभाग व शिक्षक संघटनांना एकत्रितपणे काम करावे लागेल. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे लागतील असे प्रतिपादन आ. तांबे यांन यावेळी केले. जिल्ह्यातील शिक्षकांचे मासिक वेतन झेडपी एफएमएसफ प्रणालीद्वारे व्हावे, शिक्षकांच्या शालार्थ वेतनासाठी शिक्षणाधिकारी खाते हे स्टेट बँकेत उघडावे व जिल्हा परिषदांसह सर्व पंचायत समिती स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करावीत.
सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी पीएफचा प्रस्ताव सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्याची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात यावी, त्यादृष्टीने आपल्या यंत्रणेमध्ये बदल करावे. सोबतच मेडिकल बिले, पेन्शन प्रकरणे, स्थायित्व प्रमाणपत्र व पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचे पदोन्नती असे प्रस्ताव तातडीने मंजूर होण्यासाठी प्रयत्न करावेत. सोबतच पदवीधर वेतनश्रेणी नाकारणार्या सर्व शिक्षकांचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करून त्यांना समुपदेशनाने पदस्थापना द्याव्यात अश्या सूचना आ. तांबे यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या आहेत.
2004 साली सेवेत आलेल्या शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगातील फरकाच्या पाच समान हप्त्यांपैकी फक्त दोन, तीन किंवा चार हप्ते जमा झालेले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन उर्वरित सर्व हप्ते संबंधितांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा व्हावेत. अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. सोबतच मागील चार महिन्यांपासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता फरक नियमित वेतनातून शालार्थमधून ऑनलाईन अदा करण्यासाठी पोर्टलवर टॅब सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण राज्य स्तरावर मागणी करावी व प्रलंबित महागाई भत्ता फरक लवकरात लवकर ऑफलाईन अदा करावा.
त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता लवकरात लवकर जमा करण्यात यावा अश्या सूचना तांबे यांनी केल्या आहेत. यावेळी उपशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, वेतन अधीक्षक संध्या भोर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मोहन कडलग यांच्यासह शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहकले, प्राथमिक शिक्षक संघटनेचे बापूसाहेब तांबे व शिक्षक नेते हिरालाल पगडाल, जिल्हा परिषद माजी सभापती अजय फटांगरे, जिल्हाअध्यक्ष प्रवीण ठुबे, विकास डावखरे, अविनाश निंभोरे,वैभव सांगळे, अविनाश साठे, बाबुराव कदम, कारभारी बाबर, रामनाथ मोठे , नानासाहेब बडाख, गणेश वाघ, शरद कोतकर, संजय दळवी, सुनील दुधाडे, विठ्ठल उरमुडे आदिंसह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.