जास्त पावसाचा समावेशाने विमा परताव्याची शक्यता कमी

फळबागांच्या विमा परतव्याचे ट्रीगर बदलले
जास्त पावसाचा समावेशाने विमा परताव्याची शक्यता कमी

पिंपरी निर्मळ|Pimpari Nirmal

प्रधानमंत्री सुधारित पीक विमा योजनेमधील विमा परताव्याचे निकष शासनाने बदलेले आहेत. डाळींब फळबागांच्या कमी पावसाचे ट्रीगर बदलून केवळ जास्त पाऊस झाला तरच पीक विम्याचे परतावे देण्याची तरतूद केल्याने विमा कंपन्यांना धार्जीण होणारे निकषांचा योजनेत समावेश केला असल्याने नगर जिल्ह्यातील दुष्काळी व कमी पाऊस होणार्‍या भागाला पीक विमे परताव्यांचे दरवाजे बंद झाले आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये चालू वर्षापासून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. विशेषतः फळबांगाच्या पिक विमा योजनेतून कमी पावसाचे ट्रीगर हटविण्यात आले आहे. जास्त पावसाबरोबर आर्द्रतेचाही समावेश यामध्ये करण्यात आला आहे. मात्र नगर जिल्ह्यातील बर्‍याच तालुक्यासह राहाता तालुका पर्जन्य छायेखालील आवर्षणग्रस्त व कमी पावसाचा आहे.

डांळीब फळबागाच्या नवीन पिक विमा प्रस्तावात 15 जुलै ते 15 डिसेंबर दरम्यान जास्त पाऊस व आर्द्रतेच्या तिन ट्रीगर करण्यात आल्या आहेत. यामध्ये किमान परतावा मिळण्यासाठी सलग पाच दिवस प्रतिदीन 25 मी. मी.पाऊस पडणे आवश्यक आहे. दैनंदिन आर्द्रताही 85 टक्क्याच्या पुढे नोंदली जाणे आवश्यक आहे.

म्हणजेच या पाच दिवसात सव्वाशे मी. मी. पाऊस होणे आवश्यक आहे. तसेच या पावसाच्या दैनिक कालावधी वाढत गेल्यास नुकसान भरपाई सुध्दा वाढणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात तरी राहाता तालुक्यात सलग पाच दिवस 25 मी. मी. पेक्षा जास्त झालेला नसल्याने विम्याच्या परताव्याचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे.

जुन्या फळबाग विमा योजनेत 15 जुलै ते 15 ऑगस्ट फळधारणा काळ तसेच व 16 ऑगस्ट ते 15 आक्टोबर फळवाढीचा काळ या कालावधीत पावसाचा खंड व कमी पाऊस या ट्रीगरचा समावेश होता. त्यामुळे या दुष्काळी व कमी पावसाच्या भागातील फळबागा या अडीच महिन्यात कमी पावसाच्या ट्रीगरमध्ये बसल्याने विम्याच्या परताव्यासाठी पात्र होत होत्या.

मात्र सुधारित फळबाग योजनेत कमी पावसाच्या ट्रीगरच काढल्याने शेतकर्‍यांना फळबागांच्या पिक विम्याचे परतावे मिळतील याची शक्यता धूसर झाली आहे. पर्जन्य छायेखालील आवर्षणग्रस्त कमी पावसाच्या भागातील शेतकर्‍यांसाठी ही फळबाग पिकविमा योजना अन्यायकारक असून केवळ कंपनीच्या एकतर्फी हिताचीच योजना असल्याची चर्चा शेतकर्‍यांमधून होत आहे.

टप्पा 1- जास्त पाऊस व आर्द्रता. 15 जुलै ते 15 ऑगस्ट. टप्पा 2- जास्त पाऊस व आर्द्रता. 16 ऑगस्ट ते 30 सप्टेबर. टप्पा 3- 1 ऑगस्ट 15 डिसेंबर. नवीन योजनेत कमी पाऊस, पावसाचा खंड या बाबीचा समावेश नसल्याने कमी पाऊस असलेल्या भागातील शेतकर्‍यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.

टप्पा 1- कमी पाऊस. फळधारणा कालावधी 15 जुलै ते 15 ऑगस्ट. टप्पा 2- कमी पाऊस फळवाढ कालावधी 17 ऑगस्ट ते 15 आक्टोबर. टप्पा 3- जास्त पाऊस फळ पक्व ते फळ काढणी 16 आक्टोबर ते 30 डिसेंबर. वरील योजनेत कमी पावसाच्या भागातील शेतकर्‍यांना टप्पा एक दोन मध्ये परतावे मिळत होते.

राहाता तालुक्यात वर्षभरात 500 मि.मी. सरासरी पाऊस पडतो. मात्र या विमा योजनेनुसार किमान परताव्यासाठी पाचच दिवसात सव्वाशे मि. मी.पावसाची नोदींसह 85 टक्के आर्द्रता आवश्यक आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com