नेवासा फाटा |वार्ताहर| Newasa Phata

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार घटनेच्या निषेधार्थ नेवासा फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात

सोमवारी युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या नेत्तृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी घटनापती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवी भालेराव, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुशिल धायजे, इंदिरा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण साळवे, युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे तालुका सरचिटणीस राजेंद्र वाघमारे, गणपत मोरे, भाजपाचे यडूभाऊ सोनवणे, घटनापती युवा प्रतिष्ठानचे राहुल वाघमारे, प्रसाद गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने दलित कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आंदोलनप्रसंगी अशोकराव गायकवाड म्हणाले की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार व खुनाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेने महिला सुरक्षित नसल्याचेच दाखवून दिले आहे. सिनेमातील सुशांत रजपूत व नटनट्यांचे वेळोवेळी वृत्तांकन करणार्या प्रसिद्धी माध्यमांना युवतीच्या बलात्काराची घटना लवकर दिसली नाही.

चौथ्या स्तंभाचीही मुस्कटदाबी सरकारने केली आहे. नेवाशातील गिडेगाव येथील युवतीला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करावे लागले त्यामुळे उत्तर प्रदेश व नेवाशामध्ये काय फरक आहे? असा सवाल करून पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेबाबत लक्ष घालण्याचा इशाराही यावेळी गायकवाड यांनी दिला.

यावेळी गायकवाड यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढत शेतकरी हा देशाचा कणा असताना शेतकरी व कामगार यांच्यासाठी केलेले नविन कायदे घातक असल्याचे सुतोवाच करत केंद्र सरकारवर निशाना साधून उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करून महिलांना सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्याची गरज असल्याचेही यावेळी गायकवाड यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी सुनील वाघमारे, विजय गायकवाड, जाकीर शेख, रमेश हिवाळे, गणपत मोरे, मराठा सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश झगरे, ग्रामपंचायत सदस्य राहुल वाघमारे आदींची भाषणे झाली.

यावेळी मुकिंदपूरचे माजी सरपंच प्रकाश निपुंगे, सोपान पंडित, निलेश वाघमारे, बंटी जाधव, प्रशांत खंडागळे, सुजित गोर्डे, स्वप्निल सोनकांबळे, भास्कर लिहिणार, सनी पाटोळे, पप्पू इंगळे, बाबासाहेब साळवे यांसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. रास्ता रोकोमुळे नगर - औरंगाबाद महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

पोलीस निरिक्षक रणजित डेरे व महसूल अधिकार्यांना आंदोलकांनी निवेदन दिले. पोलीस निरीक्षक डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तवार्ता विभागाचे कॉन्स्टेबल प्रशांत भराट, कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, हवालदार साळवे, कॉन्स्टेबल कुर्हाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.