
जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari
गोदावरी उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुटून 12 दिवस उलटून गेली तरी हॅरिसन ब्रँच चारीला पाणी सोडण्यात आले नाही. शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाच्या कामकाजाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाला शेतकर्यांची दया आली व शनिवारी दुपारी दोन वाजता हॅरिसन ब्रँच चारीला पिण्यासाठी व शेतीसाठी आवर्तने सोडण्यात आली. परंतु दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसेच झाले. शेतात पाणी जाते न जाते तोच रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान जेऊर कुंभारी हद्दीतील पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांच्या वस्ती लगत हॅरिसन ब्रँचचारी फुटली व लाखो लिटर पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे हे घडले, असा आरोप जेऊर कुंभारीचे उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी केला.
पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांच्या वस्ती जवळील मोठे बोरीचे झाड ग्रामस्थांनी कल्पना देऊनही चारी दुरुस्तीच्या नावाखाली काढण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी ते झाड काढू नये, अशी विनंती केली पण पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्यांनी याकडे दुर्लक्ष केले व शेवटी जे व्हायचे होते तेच झाले. हॅरिसन ब्रँच चारीचे फक्त गवत काढण्यात आले पण चारीची खोली करण्यात आली नाही. मागील आवर्तन शेतकर्यांच्या शेतात पाणी पोहचण्या अगोदरच आवर्तन बंद करण्यात आले तेव्हा शेतकर्यांच्या उभ्या पिकाला पाणी मिळाले नाही.
आता शेतकर्यांच्या शेतामध्ये रब्बीची पिके गहू, ज्वारी, हरभरा, फळभाज्या अशी पिके शेतात उभी आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने पिके पाण्यावर आली आहेत. पाण्यावाचून सुकू लागली आहेत. या चारीने चांदेकसारे, जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द, पानमळा या भागातील शेतकर्यांना पाणी मिळत असते. परंतु पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले व शेतकरी आपल्या शेतात पाण्याच्या प्रतिक्षेत राहिले. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीची भावना निर्माण झाली. घटनेची माहिती उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी राहाता पाटबंधारे विभागाला दिली असून यावेळी आवर्तने पूर्ण क्षमतेने द्यावे व एकही शेतकरी वंचित न राहता त्यांना पाणी देण्यात यावे नाहीतर तिव्र प्रकारे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी दिला.