
वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथील शासकीय धान्य गोदाम याच्यामधून मोठ्या प्रमाणावर बादड सदृश किड्यांचा परिसरात प्रादुर्भाव होत असल्याचे दिसत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने धान्य गोदामामधून मोठ्या प्रमाणावर बादड सदृश किड्यांचा हवेतून परीसरात प्रसार होत आहे.
यामुळे रस्त्यावरील नागरिकांना ये जा करताना हे किडे डोळ्यात जात आहेत. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याने अनेकांना अपघातास सामोरे जाण्याची वेळ आली आहे. तसेच हे किडे घरात तसेच अंगावर कपड्यावर कुठेही जेवणामध्ये आढळून येत असल्याने परिसरातील नागरिकांना या सर्व बाबीचा त्रास होत आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ धान्य गोदाम येथे औषध फवारणी करून संबंधित किड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील सरपंच आबासाहेब गवारे ,राजेंद्र गवारे तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे.