हरेगाव
हरेगाव
सार्वमत

हरेगावात भूमिहीन शेतमजुरांनी जमीन कसण्यास केली सुरुवात

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ हरेगावच्या पडीक जमिनी आम्हाला आमच्यावर आलेल्या करोना महामारीच्या संकटामुळे, लॉकडाऊनमुळे व उपासमारीमुळे आम्हाला कसू द्या, अशी कळकळीची विनंती हरेगावच्या शेती महामंडळ, बेलापूर कंपनीचे बेरोजगार कामगार, मागासवर्गीय, भूमिहीन, दलित, शेतमजूर आदींनी शासनाला केली आहे. त्याप्रमाणे काल मोठ्या संख्येने गोरगरीब, बेरोजगार, कामगारांनी हरेगाव मळा जमिनीत नांगर घालून जमीन कसण्यास सुरुवात केली आहे.

शेती महामंडळ व बेलापूर साखर कारखाना हे उद्योग अगोदरच बंद पडल्याने कामगार बेकार त्यात करोनाचे संकट असल्याने तीन-चार महिन्यांपासून कोठेही हाताला काम नाही म्हणून विस्थापित बेरोजगार, गोरगरीब, दीन दलित मागासवर्गीय, भूमिहीन शेतमजूर, कामगारांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, तहसीलदार श्रीरामपूर, जिल्हाधिकारी अहमदनगर, महसूलमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल, विरोधी पक्षनेते, पोलीस अधिकारी यांना निवेदने देऊन शेती महामंडळ हरेगावची पडीक जमीन कसण्यासाठी द्यावी, अशी मागणी केली आहे.

यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय भूमिहीन शेतमजूर संस्था हरेगाव यांनी 2 फेब्रुवारी 1991 पासून महसूल मंत्री यांना निवेदन दिल्यानंतर वारंवार उपोषणे केली, मोर्चे काढले, पण अद्याप निर्णय झाला नाही. 30 वर्षांपासून शेती महामंडळाची जमीन खंडकर्‍यांना वाटप केल्याननंतर पडीक आहे.

भविष्याच्या दृष्टीने विचार करून सर्व पडीक जमीन आमच्या कुटुंबीयांच्या उपजीविकेसाठी कसायला मिळावी, अशी मागणी सतत होत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत हरेगाव येथे ठराव मंजूर झाला. डिसेंबर 2019 मध्ये हरेगाव लोकप्रतिनिधींनी इशारा दिला होता की वारंवार निवेदने देऊन निर्णय न झाल्यास पोटाची खळगी भरण्यासाठी बळजबरीने जमीन कसावी लागेल. शेती महामंडळ निविदा प्रक्रियेद्वारे देऊ केलेली जमीन सामान्य कामगारांना परवडणारी नाही.

Deshdoot
www.deshdoot.com