हरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अस्मिता नवगिरे यांचे जात प्रमाणपत्र वैध

हरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अस्मिता नवगिरे यांचे जात प्रमाणपत्र वैध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव ग्रामपंचायत सरपंच अस्मिता दीपक नवगिरे यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचे पत्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या औरंगाबाद जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांचेकडून काल प्राप्त झाले. मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना सरपंच पदावर अपात्र ठरविण्यात आले होते. आता त्यांच्या सरपंच पदाच्या पात्रतेचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव ग्रामपंचायत सरपंच अस्मिता दीपक नवगिरे यांनी निवडणुकीच्या वेळी जात प्रमाणपत्र सादर केले होते. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे एक वर्षाच्या आत जातप्रमाण पडताळणी करून सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिले होते. मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदावर दि. 14 ऑगस्ट 2020 च्या आदेशाप्रमाणे अपात्र ठरविण्यात येऊन पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर नवगिरे यांनी न्यायालयीन लढाईत बाजू मांडली. परंतु 6 जुलै 2020 रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने करोना काळ असल्याने सुनावणी होऊ शकत नाही, असे आदेश दिले. त्यामुळे सुनावणी उशिरा झाली.

त्याचप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती औरंगाबाद यांचेकडून जात वैधता प्रमाणपत्र समाजकल्याण उपआयुक्त यांचे आदेश दि. 28 एप्रिल 2022 प्रमाणे अस्मिता नवगिरे यांना दि. 24 मे रोजी प्राप्त झाले. अर्जदार अस्मिता जाधव यांचा अनुसूचित जातीचा दावा मान्य करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद यांनी दिलेले जात प्रमाणपत्र क्र 2006/कास्ट/एससी/सीआर856/दि 28/9/2006 हे वैध ठरविण्यात येत आहे. व तक्रारदारांचा तक्रार अर्ज निकाली काढण्यात येत आहे, असा आदेश प्राप्त झाला.

नवगिरे यांना जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी पूर्ववत लोकनियुक्त सरपंच पदावर नियुक्ती व्हावी, अशी मागणी हरिगाव ग्रामस्थांनी केली आहे. यात आ. लहू कानडे यांनी लक्ष घालावे, अशीही मागणी होत आहे. प्रमाणपत्र वैध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com