हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील वाळू लिलावासाठी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र विरोध नोंदवित वाळू लिलाव बहुमताने फेटाळला.

शासनामार्फत वाळू लिलावाची भूमिका मांडताना तलाठी भाग्यश्री शिंदे यांनी सांगितले की, नदीपात्रातील वाळू लिलावासाठी सरकारने ग्रामसभेची शिफारस मागितली आहे. लिलावातून सरकारला त्याचप्रमाणे त्याचा काही भाग ग्रामपंचायतीला रोख स्वरूपात मिळेल. जेणेकरून ग्रामपंचायतीची भांडवली कामे, शाळा दुरुस्ती, अंगणवाडी निगडित कामे करता येतील. त्याचप्रमाणे अवैध उत्खननास आळा घालणे शक्य होईल त्यासाठी ग्रामसभेचा वाळू लिलावास होकार मिळावा, असे शासनातर्फे ग्रामसभेस कळविण्यात येत आहे.

यावर प्रतिक्रिया देताना ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या. वाळू लिलाव झाल्यानंतर होणार्या परीणामाबाबत नागरिकांनी आपल्या भावना मांडल्या. ठरलेल्या मापापेक्षा अनेक पटीने वाळू उचलली जाते. फोकलांड, जेसीबी यांना मज्जाव असताना सर्रास त्यांचा वापर होतो. यामध्ये शासकीय अधिकारी तसेच स्थानिक काही पदाधिकारी यांच्या सौजन्याने नदीपात्रातील वाळू खडकापर्यंत उचलली गेल्याचे ग्रामस्थांनी पाहिले आहे.

वाळू उचलली गेल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपून जाते आणि पिकाला व पिण्याच्या पाण्याचा यक्षप्रश्न तयार होतो. त्याचप्रमाणे पर्यावरणाला हानी पोहोचते. पाण्याअभावी गावात वाद तयार होतात. पशुपक्षी नदीकाठ सोडून जातात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. म्हणून ही ग्रामसभा वाळू लिलावास जाहीर विरोध करत आहे. ग्रामस्थांच्यावतीने अशोक बाबासाहेब घोलप यांनी वाळू लिलावाची विरोधात ठराव मांडला त्यास बाळासाहेब रमाजी अनाप यांनी अनुमोदन दिले आणि सर्व ग्रामस्थांनी हात वर करुन वाळू लिलावास विरोध दर्शविला.

यावर प्रतिक्रिया देताना तलाठी भाग्यश्री शिंदे व ग्रामविकास अधिकारी व्ही. डी. वर्पे यांनी सांगितले की, आपले म्हणणे लेखी स्वरुपात तहसीलदार राहाता यांना कळविले जाईल. ग्रामस्थांनी शासनाचे म्हणणे ऐकून घेतले त्याच प्रमाणे प्रतिक्रिया देताना शांतता राखली याबद्दल आभार मानले. या ग्रामसभेस प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक भागवत घोलप, सरपंच मनीषा माळी उपसरपंच प्राजक्ता अनाप तसेच ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटी चेअरमन रामनाथ पाबळे, व्हाईस चेअरमन पापाभाई शेख आणि सोसायटीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संखेने हजर होते.