हनुमंतगाव येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राची सेवा ऑक्सिजनवर

केवळ एक डॉक्टर व सफाई कामगारांची हजेरी, गरोदर महिलांची कुचंबना
हनुमंतगाव येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राची सेवा ऑक्सिजनवर

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

आरोग्य सेवा हा मानवी हक्क असल्याचे सरकार सांगत असले तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील प्राथमिक उपआरोग्य केंद्राची सेवा ऑक्सिजनवर आहे. केवळ एक डॉक्टर याठिकाणी उपलब्ध असल्याने एकेकाळी वैभवास प्राप्त झालेले हे उपकेंद्र सध्या कर्मचार्‍यांविना ओस पडले आहे.

आरोग्य केंद्रामार्फत चोवीस तास सेवा मिळावी. स्थानिक उद्भवणार्‍या आजारावर नियंत्रण मिळविता यावे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे तसेच रेफरल व प्रयोग शाळेची सेवा पुरविणे. आरोग्य सेवा म्हणजे नुसता औषध उपचार नाही तर आजार टाळण्यासाठी, तब्येत सुधारण्यासाठी, आजार्‍याचे पुनर्वसन करण्यासाठी मिळणारी सेवा म्हणजे आरोग्य सेवा. ही सर्व ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे, परंतु या व्यवस्थेला ग्रहण लागले असून पुरेशा कर्मचार्‍यांअभावी प्राथमिक आरोग्यसेवा ठप्प झाली आहे.

हनुमंतगाव उपआरोग्य केंद्रासाठी पाच पदे मंजूर असून आज केवळ एक समुदाय आरोग्य अधिकारी व एक सफाई कामगार ही दोनच पदावरील अधिकारी याठिकाणी कार्यरत आहेत. येथील आरोग्य सेवक पंचायत समितीकडे कार्यरत असून एक आरोग्य सेविका कोल्हारकडे सेवेत आहेत तर एक पाथरे उपकेंद्राकडे सेवेत असल्याचे कळते. महिला कर्मचारी नसल्यामुळे गरोदर स्त्रिया नोंदणी, लहान बाळांना नेहमीची लस मिळणे, गरोदर महिलांचे नियमित तपासणी व सल्ला मार्गदर्शन, आठवड्यातून एकदा डॉक्टरांची भेट घडविणे तपासणी व उपचार कुटुंब नियोजनाचे साधनाचे वाटप आदी सेवा ठप्प झालेल्या आहेत. तसेच ऐनवेळी बाळंतपणासाठी येणार्‍या महिला याठिकाणी महिला कर्मचारी नसल्याने येण्याचे टाळत आहेत.

येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पंडूरे यांनी सांगितले, रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा मी प्रयत्न करतो; परंतु कार्यालयीन कामे, मिटिंग आदीमुळे कामात कधी कधी खंड पडतो. दिवसभर येथे थांबून सेवा देत असतो. सहकारी वर्गाची गरज आहे. याबाबत वरिष्ठांना सर्व ज्ञात आहे. लवकरच याबाबत गैरसोय दूर होईल, अशी मला आशा आहे. गावातील स्थानिक पुढार्‍यांशी संपर्क केला असता पंचायत समिती सभापती, विखे पाटील यांचे कार्यालय, अधिकारी यांच्याशी संपर्क साधलेला असून लवकरच यातून तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com