हनुमंतगावात बिबट्याची पाच पिल्ले आढळली

हनुमंतगावात बिबट्याची पाच पिल्ले आढळली

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात बिबट्याची 5 पिल्ले आढळून आल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कृष्णागर जेजुरकर यांच्या शेतात उसाची तोड चालू आहे. भल्या पहाटे मजूर ऊस तोडत होते. ऊस तोडीत असताना त्यांना पिलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांनी उसाचे पाचट पेटवून आवाज येणार्‍या प्राण्यांचा वेध घेतला.

तेव्हा 5 छोटी पिले त्यांना आढळून आली. बिबट्याचे पिले पाहून मजुरांची पाचावर धारण बसली. त्यांनी मालकाला फोन केल्यानंतर सोमनाथ जेजुरकर त्या ठिकाणी आले. तोपर्यंत उजाडल्याने ही पिले सर्वांना दिसली. जवळपास बछड्यांची मादी असावी परंतु मादीचा गुरगुरण्याचा आवाज न आल्याने तसेच ऊस तोडणार्‍यांची संख्या व त्यांचा आवाज आल्यामुळे कदाचित मादी दूर पळाली असावी. ऊस तोडीचे काम थांबवले. वेळ होऊनही मादीचा सुगावा लागला नाही. सोमनाथ आणि त्याचे जोडीदार यांनी हातामध्ये शस्त्र घेऊन तोडणी कामगारांना ऊस तोडण्यास सांगितले.

दरम्यानच्या काळात वन्य प्राणीमित्र विकास म्हस्के यांच्याशी संपर्क साधला. श्री. म्हस्के यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पिलांची पाहणी केली. पिलांनी अजून डोळे उघडलेले नाहीत. त्यामुळे दोन चार दिवस वयाचे पिले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. श्री. म्हस्के यांनी वन खात्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असून पिलांना कॅरेट मध्ये ठेवून झाडाखाली दिवसभर ठेवणार असल्याचे सांगितले.

तसेच संध्याकाळी ट्रॅप कॅमेरा लावून या पिलांना मूळ जागी ठेवण्यात येणार आहे. कृष्णागर जेजुरकर यांनी या ठिकाणचा ऊस काही काळासाठी तोडणे बंद ठेवण्याची तयारी दर्शविली. जेणेकरून पिलांची आई त्या ठिकाणी येऊन पिलांचा स्वीकार करेल. ही बातमी पंचक्रोशीत पसरल्याने या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी झालेली आहे. नागरिकांनी दुरूनच पिलांना बघावे त्यांना स्पर्श करू नये, असे आवाहन कृष्णागर जेजुरकर व विकास म्हस्के यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com