हनुमंतगाव स्वस्त धान्य दुकानाबाबत तालुका पुरवठा अधिकार्‍यांशी चर्चा

हनुमंतगाव स्वस्त धान्य दुकानाबाबत तालुका पुरवठा अधिकार्‍यांशी चर्चा

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgav

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील सोसायटीमार्फत चालवल्या जाणार्‍या धान्य दुकानाच्या असमाधानकारक कारभाराविषयी हनुमंतगाव नागरिकांच्यावतीने शिष्टमंडळ राहता तालुका पुरवठा अधिकारी भारत खरात यांना भेटले.

प्रवरा बँकेचे संचालक अ‍ॅड. किसनराव कोतकर, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घोलप, सोसायटीचे व्हा. चेअरमन भागवतराव ब्राह्मणे, अशोकराव ब्राह्मणे, सावळेराम पाबळे, भानुदास डोखे, सोमनाथ अनाप, बापूसाहेब अनाप, अनिल बुचडे आदी कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या रेशन विभागाच्या अनियमीत कारभाराविषयी तालुका पुरवठा अधिकारी भारत खरात यांच्याशी चर्चा केली.

रेशन वाटपात ऑनलाईन पद्धतीमुळे नागरिकांना सोसावा लागणारा मनःस्ताप, ऑनलाईन सेवा मंदगतीमुळे वेळ वाया जाणे, वारंवार खंडित होणारी सेवा, धान्य पुरवठ्यातील अनियमितपणा त्यामुळे नागरिकांची होणारी चिडचिड, सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना होणारा त्रास आदी विषयाबाबत चर्चा केली.

पुरवठा अधिकारी श्री. खरात यांनी ऑनलाईन पद्धतीचे फायदे-तोटे समजावून सांगितले. मंत्रालयातून चालणारी ही सिस्टीम जिल्हा किंवा तालुका पुरवठा अधिकारी यांचे हातात या गोष्टीचे नियंत्रण नाही. त्यामुळे याबाबत सुधारणा करणेकामी असमर्थता दर्शविली. तसेच सोसायटीतून मिळणारे रेशन वाटप याबाबत सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनीही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

रेशन विभागासाठी होणारा पतपुरवठा त्याचा सदुपयोग, रेशन देताना घेतली जाणारी काळजी, तयार होणारे बिल याबाबत संचालक मंडळाने दक्ष राहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे राशन विभागातील कर्मचार्‍यांना स्थानिक नागरिकांकडून त्रास होऊ नये याबाबतही काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांच्या त्रासामुळे बर्‍याच ठिकाणची रेशन केंद्रे बंद होण्याच्या स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. रेशन पुरवठा पद्धतीबाबत संचालक मंडळांना माहिती असावी तसेच ऑनलाईन अडथळा याबाबतही संचालक मंडळाला ज्ञात असावे, अशी मागणी अ‍ॅड. कोतकर व अशोक घोलप यांनी केली. त्याबाबत असमर्थता दाखवत याबाबत आम्ही विचार करू, असे श्री. खरात यांनी सांगितले परंतु वाटप सिस्टीममध्ये रेशन व्यतिरिक्त इतरांना सामावून घेणे सध्यातरी शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

रेशन खरेदी-विक्रीची चौकशी संचालक मंडळाने करावी. तसेच त्यातील संख्येबाबत अधिकार्‍यांशी बोलावे. नाहक एकमेकांचे गैरसमज करण्यापेक्षा व्यवहाराची योग्य व्यक्तीमार्फत तपासणी करावी व यातूनही मार्ग न सापडल्यास पुरवठा अधिकार्‍यांशी मोकळेपणाने चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अशोक ब्राह्मणे, सावळेराम पाबळे, सोमनाथ अनाप, भानुदास डोखे आदींनी आपल्या शंका विचारून पुरवठा अधिकार्‍यांकडून माहिती करून घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com