आमच्या दारात धरण बांधून आमचे मरण कांडू नका

हनुमंता घोडे व अन्य शेतकर्‍यांची सरकारला आर्त हाक
आमच्या दारात धरण बांधून आमचे मरण कांडू नका

अकोले |प्रतिनिधी| Akole

सरकार धरणाच्या नावाखाली आमचे मरण कांडत असेल तर आदिवासी शेतकरी त्याला कडाडून विरोध करेल, आम्हाला विस्थापित करून आमच्या चुली विझवून इतरांचे संसार सुजलाम् सुफलाम् करणारे धोरण चुकीचे असून आमच्या दारात धरण बांधून आमचे मरण कांडू नका, अशी आर्त हाक हनुमंता घोडे व अन्य शेतकर्‍यांनी सरकारला दिली आहे.

अकोले, पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पठार भागाला मिळावे यासाठी सरकारने 65 कोटीची योजना मंजूर केली असून कोतूळ परिसरातील शेतकर्‍यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. तर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दोनशे एमसीएफटीचे धरण पिंपरी शिंदे परिसरात करण्याचे सूतोवाच केले असून या धरणाला आदिवासी शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला आहे. कोटी रुपये दिले तरी फणभर जमीन देणार नाही, असा ठोस निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे.

याबाबत शिंदे परिसराला भेट दिली असता 1972 पासून या गावाला पिण्यासाठी पाणी नाही 500 लोकसंख्या असलेल्या गावातील शेतकर्‍यांची जमीन गावच्या खाली खोल दरीत आहे. येथील शेतकरी खोल दरीत उतरून आपली शेती करतात प्रत्येकाच्या वाट्याला तीन ते दहा एकरांपर्यंत शेती असून दुसर्‍या बाजूला कोहणे व पिंप्रीचे शिवार आहे. त्या जमिनी खडकाळ व गायरान आहे. मात्र शिंदे गावच्या जमिनी सपाट, सुपीक आहेत. बारमाही पिके हे शेतकरी घेतात शेजारून ओढा गेला असून त्या ओढ्याला पाणी असल्याचे हनुमंता घोडे, मारुती येसू घोडे, गणपत घोडे आदी सांगतात.

शेती हेच आमच्या उपजीविकेचे साधन. त्यात इथे धरण झाले तर आम्ही खायचे काय? यापूर्वी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी धरण मंजूर केले होते, त्यांना आम्ही विरोध केला होता. आता आमदार डॉ. किरण लहामटे धरण बांधणार असल्याचे त्यांनी पिंपळगाव खांड येथे झालेल्या सभेत सांगितले. मात्र आम्हा गरिबांना उघड्यावर आणण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. सरकार पुनर्वसन करण्याच्या नावाखाली आमचे गाव सोडून दुसरीकडे जमीन देणार असल्याचे गाजर दाखवून आदिवासींना विस्थापित करू पाहत असेल तर आम्ही ते कदापि होऊ देणार नाही.

त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली तर संपूर्ण गाव एकदिलाने विरोध करू. गावाला प्यायला पाणी नाही, महिला डोक्यावर हंडे घेऊन दरीत जातात, सरकार प्यायला पाणी देत नाही आमच्या जमिनी ताब्यात घेऊन आम्हाला बेघर करत असेल तर मुळीच सहन करणार नाही, असे हनुमंत घोडे म्हणाले.तुकाराम घोडे धरणग्रस्तांना सहानुभूती भरपूर पण कृती शून्यवत असे का? धरण उभारणे म्हणजे विस्थापितांचे मरणच कांडणे. असे होता कामा नये अशा प्रकारची आर्त हाक या शेतकर्‍यांनी सरकारला दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com