
नेवासा फाटा |प्रतिनिधी| Newasa Phata
नेवासा फाट्याजवळील हंडीनिमगाव नगर-औरंगाबाद रोड परिसरात गेल्या दोन दिवसापूर्वी रात्री झालेल्या तुफान पावसामुळे उभ्या पिकांमध्ये तिन ते चार फूट पावसाचे पाणी साचून ऊस, सोयाबीन, कपाशी, चारा पिके पाण्याखाली गेली. रहिवासी, व्यावसायिक यांचे दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
त्याचे खरे कारण जाणून घेतले असता, रोडच्या पूर्वेकडून गावाकडे ओढ्याला मिळणारे पाणी जाण्यासाठी दोन ओढे आहेत. त्या ओढ्यावरील पूल अतिशय अरुंद आहेत. तसेच त्यावर अतिक्रमण झालेले आहे. अशा तक्रारी आहेत. त्यामुळे येणार्या पाण्याच्या प्रवाहाला अरुंद असल्यामुळे अडथळा निर्माण होवून सर्व पाणी आजूबाजूच्या शेतात, घरात, दुकानात शिरून मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत हंडीनिमगाव येथील सरपंच अण्णासाहेब जावळे व सामाजिक कार्यकर्ते अॅड. कल्याणराव पिसाळ यांनी तहसीलदार नेवासा यांचेकडे वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु शासन दरबारी कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न हंडीनिमगावच्या ग्रामस्थांना पडला आहे.