
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
खडकी (ता. नगर) परिसरातील दोन गावठी दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने छापे टाकत सुमारे 31 हजार रुपये किंमतीचे 600 लीटर गावठी हातभट्टी दारू बनविण्यासाठीचे रसायन जप्त करून ते नष्ट केले. तर हे गावठी दारू अड्डे चालविणार्या दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पवार वस्तीवर अशोक विश्वनाथ पवार (रा.खडकी) याच्या घराच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून 20 हजार रुपयांचे रसायन, एक हजार रुपयांची दारू पकडण्यात आली. दुसरा छापा तेथून जवळच असलेल्या वालुंबा नदीच्या कडेला सारोळा कासार गावच्या शिवारात संजय सूर्यभान पवार (रा.खडकी) याच्या गावठी दारू अड्ड्यावर टाकण्यात आला. त्या ठिकाणी 10 हजार किमतीचे 200 लिटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जप्त केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, अंमलदार आर.एस. खेडकर, गांगर्डे, लबडे, इथापे, खिळे, महिला अंमलदार हरिश्चंद्रे आदींच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे.