हज यात्रेसाठी विमान सेवा तसेच हज हाऊसची व्यवस्था करावी

मुस्लिम समाजाचे खासदार सुजय विखेंना निवेदन
हज यात्रेसाठी विमान सेवा तसेच हज हाऊसची व्यवस्था करावी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येथील काकडी विमानतळावरून हज यात्रे करिता जाणार्‍या भाविकांना शिर्डी ते सौदीअरेबिया विमान सेवा सुरू व्हावी तसेच याठिकाणी यात्रेकरुंना राहण्याकरिता हज हाऊस बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निवेदन शिर्डीतील काँग्रेसचे कार्याध्यक्ष समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाने खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, साईबाबांचा सबका मालिक एक व सर्वधर्मसमभाव हा संदेश जगातील कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचला. त्यामुळे संपूर्ण देशातून नव्हे तर देशा बाहेरून भाविक दर्शनासाठी येतात. याच पावनभूमीमध्ये रेल्वेस्थानक, विमानतळ आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहे.

शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे भविष्यातील गरज ओळखून महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण महामंडळाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आले. सौदी अरेबियातील मक्का मदीना या मुस्लिम समाजातील अतिशय पवित्र धार्मिकस्थळी जाण्याकरिता शिर्डी येथून विमानसेवा सुरू होण्याकरिता आपल्या माध्यमातून नागरी विमान मंत्रालय, भारत सरकारला आपण शिफारस करावी तसेच विमानतळाजवळ अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकाराच्या माध्यमातून हज हाऊसची निर्मिती करण्यात यावी.

जेणेकरून पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे आदी जिल्ह्यांतील दरवर्षी हज व उमरा यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांसाठी सुलभता होईल व मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही हवाई वाहतूक शिर्डी विमानतळावर वळविल्यास तेथील देखील नागरिकांची वर्दळ कमी होऊन त्याठिकाणी जाण्यासाठी नागरिकांचा वेळ वाचेल. नगर जिल्ह्याच्या आसपास असणार्‍या जिल्ह्यातील हजारो भाविकांना काकडी विमानतळ येथून हज यात्रे करिता जाण्याकरिता सोपे होईल. आपल्या मतदारसंघात हा प्रकल्प यावा आणि त्याची पायाभरणी व्हावी, यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे निवेदन शिर्डीचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष समीर शेख तसेच मुस्लिम बांधवांनी खा. सुजय विखे पाटील यांना दिले.

याप्रसंगी जामा मस्जिद ट्रस्टचे बाबाभाई सय्यद, शमसुद्दीन इनामदार, रज्जाक शेख, जावेद शेख, लतीफ शेख, शफीक शेख, मोइन सय्यद, सुभान जनाब, अमीर शेख, गनी पठाण आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

निवेदनावर प्रतिक्रिया देताना खा. डॉ. सुजय विखे म्हणाले, शिर्डी येथे हज हाऊस तसेच सौदी अरेबिया येथे मक्का मदीना यात्रेकरिता जाणार्‍या भाविकांना दर्शन घेण्याकरिता काकडी विमानतळावरून जाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी लवकरच प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com