
अहमदनगर | ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar
यंदा 2023 च्या पहिल्याच (जानेवारी) महिन्यांपासून जिल्ह्यात गारपिटीचा सिलसीला सुरू आहे. गेल्याचा चार महिन्यांत जिल्ह्यात तीन वेळा गारपिट झाली असून यात 11 तालुक्यातील 27 हजार 267 शेतकर्यांच्या 15 हजार 946 हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहेत. एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी आसामानी संकटात असतांना दुसरीकडे राजकारणी कोणी राम मंदिर, अदाणी चौकशी, हनुमान चालीसा यात गुरफटलेला दिसत असून गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांच्या चेहर्यावर आर्थिक मदत रुपी हासू कोण आणणार हा प्रश्न आहे.
गेल्या वर्षी परतीच्या सततच्या आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची हाता तोंडाशी आलेली पिके वाया गेली होती. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कांदा, मका, तूर, बाजारी आणि चारा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे परतीच्या सततच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या उशीरा झाल्यात. यात विशेष करून दक्षिण भागात ज्वारीची पेरणी 70 टक्क्यांच्या जवळपास पेरणी झालीच नाही. खरीप वाया गेल्यानंतर शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने कांदा पिकवला.
मात्र, त्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत असतांना आता जानेवारीपासून महिनाभराच्या अंतराने अवकाळी पाऊस आणि गारपिट होत आहे. यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा, आंबा, भाजीपाला पिके, फळ बागांचे नुकसान होतांना दिसत आहे. जानेवारी महिन्यांत जिल्ह्यात राहुरी आणि नेवासा तालुक्यात झालेल्या गारपिटीत 1 हजार 421 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यात शेतकर्यांचे गव्हाचे उभे पिक पूर्णपणे भूईसपाट झाले होते. त्यानंतर पुन्हा 21 मार्चला गारपिट झाली.
यात नेवासा, संगमनेर, कोपरगाव, नगर, पाथर्डी, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी आणि राहाता या 9 तालुक्यात अवकाळी बरसला. यात 14 हजार 784 शेतकर्यांचे 7 हजार 841 हेक्टवर नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा 7 एप्रिला जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव, कोपरगाव, नगर आणि पारनेर या पाच तालुक्यात गारपिट आणि अवकाळीचा तडाखा बसला आहे. यात 50 गावातील 12 हजार 483 शेतकर्यांचे 6 हजार 684 हेक्टवर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात चार महिन्यांत तीन वेळा झालेल्या गारपिटीत 27 हजार 267 शेतकर्यांचे 15 हजार 946 शेतकर्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे.
सततच्या पावसाच्या अनुदानाची प्रतिक्षा
राज्य सरकारने सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेली आहे. मात्र, जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीच्या भरपाईपोटी 291 कोटींचे अनुदान आलेले आहे. हे अनुदान शेतकर्यांना वर्ग करण्याची कार्यवाही सध्या सुरू असली तरी याच काळातील सततचा पाऊस यांच्या अनुदानाची अद्याप शेतकर्यांना प्रतिक्षा आहे. जिल्हा प्रशासकडे याबाबत विचारणा केली असता, सततच्या पावसाच्या नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला सादर केले असल्याचे सांगण्यात आले. त्यातच आता जानेवारीपासून आतापर्यंत झालेल्या तीन गारपिटीमध्ये नुकसानाची भरपडली असून शासन शेतकर्यांना कधी आर्थिक मदत देणार याकडे शेतकर्यांचे लक्ष आहे.
कोणाकडे मांडणार कैफियत
जिल्ह्यात झालेल्या गारपिटीत गहू, मका, उन्हाळी बाजारी, कांदा, वाटाणा, कलींगड, टोमॅटो, आंबा, झेंडू, उन्हाळी सोयाबी, कांदा, केळी, डाळींब या पिकाचे नुकसान झालेले आहे. यातील अनेक पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंत शेतकर्यांना 50 हजार जे एक लाख रुपयांपर्यंत खर्च येत असून कधी पिकाला बाजार भावच नाही, तर कधी अवकाळी गारपिट याचा दणका बसत असल्याने शेतकर्यांनी कोणाकडे कैफियत मांडाची हा प्रश्न निर्माण झाला आहे.