गारपीटीचा तडाखा

श्रीरामपूर, राहात्याच्या पूर्व भागातील पिकांचे प्रचंड नुकसान
गारपीटीचा तडाखा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील गोदावरी नदीकाठच्या गावांना काल दुपारी अवकाळी पावसाने तडाखा दिला. वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या गारपिटीने शेतकरी तसेच लग्नातील वर्‍हाडी मंडळींची चांगलीच धावपळ झाली.

या गारपिटीमुळे कांदा, ज्वारी आणि हरभरा या पिकांना मोठा दणका बसला. त्यामुळे नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून होत आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी, माळवाडगाव, महांकाळवाडगाव, कमालपूर, भामाठाण, घुमनदेव, घोगरगाव, भोकर, गोंडेगाव, सराला गोवर्धन, खानापूर राहाता तालुक्यातील चितळी, वाकडी, जळगाव तसेच वैजापूर तालुक्यातील चेंडूफळ, बाजाठाण, शनी देवगाव या भागात गारपीट झाली. गारांमुळे कांदा, गहू, ऊस या पिकांचे नुकसान झाले.

टाकळीभान वार्ताहराने कळविले की, श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील घुमनदेव येथे काल दुपारी आवकाळी पावसाचे आगमन झाले. अचानक सुरु झालेल्या पावसात हलकासा गारांचा वर्षाव झाला. हवामानातील सततच्या बदलामुळे कधी थंडी, कधी पाऊस तर कधी कडग ऊन अशी आवस्था सध्या पहावयासा मिळत आहे. वातावरणातील बदलाचा सर्वात जास्त फटका शेती क्षेत्राला बसत आहे. बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्र निसर्गाचा जुगार ठरत आसल्याचे गेल्या काही दिवसांपासुन अनुभवायास मिळत आहे.

दोन दिवसापासुन ढगाळ वातावरण तयार झाल्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. सध्या कांदा लागवड मोठ्या प्रमाणात परिसरात सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासुन असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका काल मंगळवारी गाराच्या पावसाने काही ठिकाणी फटका बसला. दुपारच्या सुमारास अचानक जोरदार वारा सुरु झाला व वार्‍यासोबत तुरळक स्वरुपात पावसाचे आगमन झाले. परीसरातील घुमनदेव येथे चांगल्याच गारा पडल्या. शेतीची कामे त्यामुळे दिवसभर खोळंबली होती. गारांमुळे शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा गारपिटीचा धसका घेतला आहे.

माळवाडगांव वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार- काल सोमवारी रात्री कडाक्याची थंडी तर आज मंगळवार सकाळपासून तुरळक, ढगाळ वातावरणात पावसाची यत्किंचितही चाहूल नसताना श्रीरामपूर तालुका गोदाकाठी पुर्व परिसरातील गावे गारपीट पावसाने झोडपून काढल्याने कांदा कोवळ्या रोपासह लागवड झालेली कांदा गहू, अन्य पीकांन चांगलाच फटका बसला असल्याने या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदील झाले आहे

मराठवाडा परिसरात 1 जानेवारीपर्यंत गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने, श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठची गावे मराठवाड्याचे हद्दीवर असल्याने धक्का बसण्याची शक्यता होती. दुपारी अचानक गारांचा तडाखा बसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. हा स्त्रोत गोदावरीच्या काठाकाठाने संपूर्ण पुर्व परिसर वेढेल असे वातावरण नसताना सराला, गोवर्धन, महांकळवाडगांव, खानापूर, माळवाडगांव मुठेवाडगांव, भामाठाण, कमालपूर शिवार झोडपून काढले. गारांचा जोरदार तडाख्याने कांदा लागवड, ऊस तोडणी करणारे पुरूष महीला मजूर, गायी चारणारे गुराखी अचानक आलेल्या या संकटाने हवालदील झाले. कुठं अर्धा तास तर बहुतांश ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटात गारांचा खच तयार झाला.

शेतातील अर्धवट कामे सोडून प्रत्येक जण गारापासून बचाव करण्यासाठी आश्रयाला गेले. रब्बीतील कांदा लागवड हंगाम अतिवृष्टीमुळे उशीराने सुरू असल्याने कांदा रोपास लागवड झालेल्या सर्व कोवळ्या पिकांना या गारपीटीचा फटका निश्रि्चत बसणार आहे.

खैरी निमगांव वार्ताहर कळवितो की, श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथे काल दुपारी अचानकपणे हरभर्‍याच्या आकाराएवढ्या गाराचा पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. गारांच्या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा रोपे, कांदा, भाजीपाल्याच्या मोठ्या नुकसानीची शक्यता आहे. करोनाच्या नवनविन व्हेरीएंटमुळे अर्थव्यवस्थेला शेतीनेच तारल्याचे आढळून आले असले तरी या काळात शेतीवरच सातत्याने अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी आणि आता गारपीट यामुळे शेतीचे प्रत्येक हंगामात मोठे नुकसान होत आहे.

या गावांत नुकसान

श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी, माळवाडगाव, महांकाळवाडगाव, कमालपूर, भामाठाण, घुमनदेव, घोगरगाव, भोकर, गोंडेगाव, सराला गोवर्धन, खानापूर राहाता तालुक्यातील चितळी, वाकडी, जळगाव तसेच वैजापूर तालुक्यातील चेंडूफळ, बाजाठाण, शनी देवगाव.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com