
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
चालू महिन्यात 15 ते 18 मार्चदरम्यान जिल्ह्यात झालेल्या गारपिटीत 11 तालुक्यातील शेती पिकांना फटका बसला आहे. या गारपिटीत 11 तालुक्यांतील 129 गावांत 8 हजार 894 शेतकर्यांचे 4 हजार 842 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
दरम्यान, याच कृषी विभागाचा मागील आठवड्यात प्राथमिक पंचनामा अहवालात जिल्ह्यातील 9 तालुक्यात या गारपिटीत 128 गावांतील 14 हजार 785 शेतकर्यांचे 7 हजार 841 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यात सर्वात जादा नुकसान श्रीरामपूर तालुक्यातील 55 गावांतील 6 हजार 981 शेतकर्यांचे 3 हजार 975 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे दाखवण्यात आले होते.
जिल्ह्यात झालेल्या 15 ते 18 मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीत शेतकर्यांचे कांदा, गहू, मका, भाजीपाला, चारापिके, ऊस, संत्रा, आंबा, डाळिंब, चिकू, लिंबू, द्राक्ष, टोमॅटो, ज्वारी, हरभरा या शेती पिकांसह झेंडू या फूल पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या संयुक्त पाहणीत नुकसानीची ही आकडेवारीसमोर आली आहे. या गारपिटीतून अकोले, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत आणि पारनेर तालुके बचावले असल्याचे प्राथमिक पंचनामा अहवालात सांगण्यात आले होते. मात्र, अंतिम पंचनामा अहवालात पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अंतिम पंचनाम अहवालात नगर, अकोले, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी, जामखेड आणि नेवासा तालुक्यातील 8 हजार 894 शेतकर्यांचे 4 हजार 842 हेक्टरावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. याबाबतच अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला पाठवला असून या अहवालावर आता जिल्हाधिकारी यांची सही झाल्यावर हा अंतिम होवून राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.