केडगावात पोलिसांनी पकडला गुटखा, अन्न प्रशासन म्हणते माहितीच नाही

केडगावात पोलिसांनी पकडला गुटखा, अन्न प्रशासन म्हणते माहितीच नाही

चार दिवसानंतरही पत्र नाही : कारवाई संशयाच्या भोवर्‍यात

अहमदनगर (प्रतिनिधी) - सुगंधी तंबाखू व गुटखा वाहतूक करणारा एक टेम्पो शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे पकडला. टेम्पोसह सात लाख 87 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केेलेला मुद्देमाल चार दिवस झाले तरी अन्न प्रशासन विभागाकडे देण्यात आलेला नाही. कारवाई बाबत आम्हाला कोणतीही माहिती नव्हती, कारवाईनंतर मुद्देमाल आमच्याकडे दिला नसून अद्याप पत्र मिळाले नसल्याचे अन्न प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले. यामुळे शहर पोलिसांनी गुटख्यावर केलेली कारवाई संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

शहर उपअधीक्षक ढुमे यांनी त्यांच्या कार्यालयात काम करणारे पोलीस नाईक हेमंत खंडागळे, पोलीस शिपाई सागर द्वारके यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्यात रात्र गस्तीसाठी असलेले उपनिरीक्षक मनोज कचरे, सुजय हिवाळे, तानाजी पवार यांच्या पथकाला गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यासाठी केडगाव बायपास येथे पाठविले होते. पथकाने केडगाव बायपास येथे सापळा लावून टेम्पो पकडला. सदर टेम्पोची दोन पंचासमक्ष झडती घेतली. यावेळी तीन लाख 48 हजार 480 रूपयांचा गुटखा व 38 हजार 720 रूपये किंमतीची सुगंधी तंबाखू मिळून आली आहे. या प्रकरणी आसीफ शेख सिकंदर (वय 22 रा. झेंडीगेट, नगर) व आवेद शेख निसार (वय 24 रा. पंचपिरचावडी, नगर) यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई सागर द्वारके यांनी फिर्याद दिली आहे.

उपनिरीक्षक कचरे यांनी सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून तसा सविस्तर पंचनामा करून जप्त मुद्देमाल ताब्यात घेतला. पुढील कारवाई कामी सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, नगर यांना कळवुन आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. असे, पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, याबाबत अन्न प्रशासन विभागाकडे पत्र प्राप्त झाले नाही. यामुळे पोलिसांनी सदर जप्त केलेला गुटखा व सुगंधी तंबाखूचे काय केले, आम्हाला माहिती नाही, असे सहायक आयुक्त शिंदे यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी कारवाई बाबत माहिती दिली नाही. कारवाई केल्याचे पत्र अद्याप मिळाले नाही. कारवाई दरम्यान गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. यासाठी अन्न प्रशासन विभागाचे कर्मचारी सोबत असणे आवश्यक आहे. कारवाई केल्यानंतर पत्र मिळाले तर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतो. आम्हाला अजून पत्रच मिळाले नाही.

- संजय शिंदे (सहा. आयुक्त अन्न प्रशासन, नगर)

कलम 328 वगळले

गुटखा विक्री गुन्ह्यासाठी भारतीय दंड संहिता कलम 328 देखील लागू करता येणार असल्याचा निर्णय जानेवारी 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला. एका टपरी चालकावर गुटखा विक्री करत असताना केलेल्या कारवाई प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मार्च 2021 मध्ये भादंवि कलम 328 नुसार एक गुन्हा दाखल आहे. मात्र केडगाव येथे पकडलेला गुटखा सुमारे चार लाखांचा असून देखील पोलिसांनी कलम 328 लावले नाही. भादंवि कलम 188, 272, 273 असे कलम लावले असून 328 मात्र वगळले आहे. यामुळे गुटखा विक्रेत्यांना वाचविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला असल्याचे दिसून येते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com