15 लाखांचा गुटखा प्रकरणी अकोलेतील व्यापारी वसिम तांबोळीस अटक

15 लाखांचा गुटखा प्रकरणी अकोलेतील व्यापारी वसिम तांबोळीस अटक

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील वाशेरे गावच्या शिवारात दत्तात्रय गजे यांच्या घरात सुमारे 14 लाख 14 हजार 600 रुपयांचा बेकायदा गुटखा आढळून आला होता. या प्रकरणी अकोले शहरातील वसिम हमीद तांबोळी (वय 30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. अकोले तालुक्यात राजरोसपणे सुरू असणार्‍या गुटखा विक्रीला त्यामुळे आळा बसेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.

अकोले परिसरात बेकायदा गुटख्याची विक्री होत असून वाशेरे परिसरात गुटख्याचे केंद्रबिंदू असल्याबाबत गोपनीय माहिती घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.मिथुन घुगे यांनी वाशेरे येथील दत्तात्रय गजे यांच्या घरावर 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास छापा टाकून सुमारे 15 लाख रुपयांचा गुटखा पकडला होता. या कारवाईमुळे छुप्या पध्दतीने गुटखा विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले होते. वाशेरे येथे पकडलेला हिरा मसाला गुटखा असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुटखा बाहेरून आणल्याचे सागितले.

तर हिरा नावाचा अंमली गुटखा असलेल्या दोन पिकअप गाडीभर हा माल आहे. एका गाडीत 78 व दुसर्‍या गाडीत 79 गोण्या अशा एकूण 157 गोण्या, एका गोणीत 120 पुडे असा माल असून अन्न पदार्थाचे नाव हिरा पान मसाला, जप्त साठा 9 लाख 92 हजार 160 रुपये तर 92160 तबांखु जप्त साठा 5 लाख 2 हजार 440 रुपये असे दोन्ही मिळून 14 लाख 14 हजार 600 रुपयांचा बेकायदा गुटखा पकडण्यात अकोले पोलिसांना यश आले आहे.

तर हमीद तांबोळी याने महाराष्ट्र राज्यामध्ये वरील प्रतिबंधीत अन्न पदार्थाची उत्पादन, वाहतूक, वितरण, साठा व विक्री वर बंदी असल्याचे माहीत असून या प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा, विक्री व व्यवसाय करून स्वत:च्या आर्थिक लाभाकरिता लोकसेवकाचे अधिसुचनेचे उल्लंघन केले असल्याची फिर्याद राजेश नामदेव बडे (वय 47 वर्षे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन अ.नगर) यांनी त्याच दिवशी रात्री उशिरा अकोले पोलिसांत दिल्यावरून गुन्हा रजि नंबर 527/2022 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व त्याखालील नियम व नियमने 2011 कलम 26 (2), (1), 27 (3), (ऊ), 27 (3), (ए) सह वाचन कलम 30 (2) (1) सह वाचन कलम 3 (1), (27) चे तसेच भारतीय दंड संहिता कलम 188, 272, 273, 328 प्रमाणे गुन्हा अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.पो.नि.मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भूषण हांडोरे करत आहेत.

... सर्रास मिळतोय गुटखा

अकोले शहरासह राजूर, कोतूळ, शेंडी, समशेरपूर, देवठाण, ब्राह्मणवाडा या प्रमुख गावांसह आदिवासी भागातील अनेक गावांत सर्रास गुटखाविक्री होत असल्याचे सध्या चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी अकोल्यात तांबोळी यांचेकडे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा गुटखा पकडल्यानंतर गुटखा विक्रेत्यांनी धास्ती घेतली होती. परंतु अलीकडील काही माहिन्यांत कारवाई मंदावल्याचे पाहायला मिळाल्यानंतर पुन्हा गुटखा दलाल आणि गुटखा विक्रेते राजरोसपणे गुटखा विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. पण मात्र अन्न सुरक्षा प्रशासनऐवजी अकोले पोलिसांनी सुमारे 15 लाख रुपयांचा बेकायदा गुटखा पकडून वसिम हमीद तांबोळी याला अटक केल्याने अन्न सुरक्षा भेसळ विभागाच्या गलथान कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com