
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दिल्लीगेट परिसरातून जप्त करण्यात आलेल्या 10 लाखांचा गुटखा प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तोफखाना हद्दीत गुटखा पकडल्यानंतर सुरूवातीला कोतवाली पोलिसांकडे हा तपास देण्यात आला होता. आता पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे तो तपास वर्ग करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून 10 लाखांचा गुटखा पकडला. याप्रकरणी हरिश खेमकरण खंडोजा (वय 36, रा. प्रवरानगर ता. राहाता), दीपक पोपट यादव (वय 39, रा. ग्राम्हणगल्ली माळीवाडा) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुटख्यासह एकूण 17 लाख 14 हजार 512 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दुसर्याच दिवशी पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग झाल्याने पोलीस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
तोफखाना पोलिसांच्या हद्दीत कारवाई होऊनही या गुन्ह्याचा तपास सुरूवातीला कोतवाली पोलिसांकडे व नंतर स्थानिक गुन्हेकडे सोपविण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आल्याचे उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी सांगितले.