एक कोटीच्या गुटख्याचा तपास रखडला

मुंबईच्या ‘त्या’ दोघांना अटकच नाही: गोडाऊन मालकही मोकाट
एक कोटीच्या गुटख्याचा तपास रखडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोतवाली पोलिसांनी 16 फेब्रुवारी रोजी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्यामध्ये मुंबई येथील दोघांची नावे समोर आली आहे. त्यांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आलेले नाही. दुसरीकडे गोडाऊन मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे हा अद्यापही पसार असून त्याला अटक कधी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत कोटीचा गुटखा पकडल्यानंतर या गुन्ह्याचा तपास रखडला गेल्याची चर्चा आहे.

कोतवाली पोलिसांनी त्यांच्या हद्दीत दुचाकीवरून गुटखा वाहतूक करणार्‍या दोघांना पकडले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील बोल्हेगाव परिसरात एका शेतामध्ये छापा टाकला. तेथे एक कोटी एक लाख 56 हजार 720 रूपये किंमतीचा गुटखा पकडला होता. 10 जणांना अटक केली होती. तपासादरम्यान मुंबईच्या दोघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दुसरीकडे गुटखा गोडाऊनचा मालक मोकाट असून त्याला कधी पकडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्यानंतर त्याच्या मुळाशी जाण्याचा दावा कोतवाली पोलिसांनी केला होता. मात्र तसे होताना दिसत नाही.

एक कोटीच्या गुटखा कारवाईनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रपरिषद घेतली होती. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही गुटख्याची साखळी शोधणार असून त्याच्या मुळापर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता मात्र तशा प्रकारचा तपास होताना दिसत नाही. कारण 10 ते 12 दिवस झाल्यानंतर देखील गुटख्या प्रकरणाच्या तपासात प्रगती दिसून येत नाही. गोडाऊन मालक मोकाट आहे. मुंबई येथील दोघांची नावे समोर आल्यानंतर देखील त्यांना अटक झालेली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com