
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दिल्लीगेट परिसरातून जप्त करण्यात आलेला 10 लाखांच्या गुटखा प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यांनी याप्रकरणी प्रफुल्ल शेटे (रा. सावेडी) याला अटक केली आहे. गुन्हे शाखेने गणेश हुच्चे याला गुटखा प्रकरणात आरोपी केले आहे. तो यामागील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समजते. तो पसार झाला असून त्याच्या अटकेसाठी पथके रवाना असल्याची माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी दिली.
दरम्यान यापूर्वी अटकेत असलेले हरिश खंडोज, दीपक यादव यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यांच्यासह शेटे याला न्यायालयासमोर हजर केले असता तिघांनाही एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गणेश हुच्चे व राहुल शर्मा (रा. माळीवाडा) हे दोघे अद्याप पसार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून 10 लाखांचा गुटखा पकडला. याप्रकरणी हरिश खंडोजा व दीपक यादव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यांना अटक करण्यात आली होती.
यानंतर या गुन्ह्यात गणेश हुच्चे, राहुल शर्मा, प्रफुल्ल शेटे यांची नावे निष्पन्न झाली. मात्र, या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दुसर्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग झाला. स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास येताच त्यांनी गणेश हुच्चे याला या गुन्ह्यात आरोपी केले आहे. तो गुटखा प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जाते. त्याच्या मागावर पोलीस आहेत. त्याच्यासह शर्माला अटक करण्याचे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेसमोर आहे.
तो कर्मचारी ‘मास्टरमाईंड’
विशेष पोलीस महानिरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने दिल्लीगेट परिसरातून जप्त केलेला गुटखा कर्नाटकातून सोलापूरमार्गे नगरमध्ये येत होता. त्याची व्यवस्था माळीवाडा व कल्याण रोडवरील गोडाऊमध्ये गेली जात होती. तेथून तो वितरीत केला जात होता. दरम्यान हा गुटखा नगरमध्ये आणण्यात एका बडतर्फ कर्मचार्याचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. एलसीबी त्यालाही यात आरोपी करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तो कर्मचारी पूर्वीपासून या अवैध गुटखा खरेदी-विक्रीत ‘मास्टरमाईंड’ असून त्याच्या मध्यस्थीतून अवैध गुटखा खरेदी-विक्री केली जात आहे.