संगमनेरात १ लाख १३ हजार रुपयांचा गुटखा जप्त

संगमनेरात १ लाख १३ हजार रुपयांचा गुटखा जप्त

संगमनेर ( शहर प्रतिनिधी) - अहमदनगरच्या अन्न व भेसळ प्रशासनाने गुरुवारी  सकाळी शहरातील पद्मानगर येथे छापा टाकत  सुमारे १ लाख १३ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

 गुटखा उत्पादन व विक्री ला राज्यात बंदी असतानाही संगमनेर तालुक्यात मात्र खुलेआम बेकायदेशीररित्या गुटखा विक्री सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. शहरातील मालदाड रोड परिसरात बेकायदेशीर रित्या गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती  अहमदनगर येथील अन्न व भेसळ च्या अधिकाऱ्यांना समजली. या खात्याच्या पथकाने  काल  सकाळी  शहराच्या  पद्मानगर परिसरात राहणार्‍या नरसय्या पगडाल याच्या घरात छापा टाकला.

त्याच्या घरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा केला असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी १लाख १३ हजार रुपयांचा हिरा गुटखा जप्त केला .  वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये हिरा कंपनीसह अन्य गुटखा आणि त्यात वापरल्या जाणार्‍या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा पथकाच्या हाती लागला. तो सगळा माल जप्त करुन शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून गुटख्याचा साठा करणार्‍या पगडाल यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्नभेसळ च्या या कारवाईमुळे बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com