अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे तीन गावठी कट्ट्यासह पप्पू उर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

15 जानेवारीला ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध अग्नीशस्त्र धारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे पप्पू चेंडवाल नामक तरुण गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.

त्यावरून त्यांच्या पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख, सपोनि राजेंद्र सानप,पोसई गणेश इंगळे, पोहेकाँ भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेटेकर, संदीप घोडके, पोना विशाल दळवी, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंके, रवीकिरण सोनटक्के व उमाकांत गावडे यांनी गुंजाळे गावात खंडोबा मंदिराकडे जाणार्या रोडवर सापळा रचला. आणि एका तरूणास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकी केली असता त्याने पप्पू उर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल वय 24 रा. गुंजाळे असे सांगितले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे तीन गावठी कट्टे मिळून आले. त्याच्यावर राहुरी पोलीसांत आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सोनई, राहुरी, नगर, शेवगावात गुन्हे

पप्पू उर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राहुरी पोलीस ठाणे, चोपडा ग्रामीण, एमआयडीसी पोलीस ठाणे, सोनई, तोफखाना, विरगाव, शेवगाव पोलीस ठाण्यांत विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.