गुहा येथील कंपनीच्या अनधिकृत जमीन वापराच्या चौकशीची मागणी

गुहा येथील कंपनीच्या अनधिकृत जमीन वापराच्या चौकशीची मागणी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील गुहा येथील गटनंबर 330/1 मधील एका डेव्हलपर्स कंपनीच्या अनाधिकृत जमीन वापराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आरपीआय आंबेडकर गटाच्या वतीने राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी म्हटले, गुहा येथील गटनंबर 330/1 मध्ये एका डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने डांबर मिक्सिंगसाठी प्लॅन्ट उभारला असून नगर ते कोपरगाव रस्ता डांबरीकरण आणि खडीकरणासाठी आवश्यक प्रक्रिया उद्योग गटनंबर 330/1 मध्ये चालणार आहे. मात्र, त्या गटाचे व्यावसायिक कारणासाठी वापर होत असेल तर त्या गटाचे अकृषीक क्षेत्रात रूपांतर करणे आवश्यक आहे. तसेच गुहा ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्राची सुद्धा आवश्यकता आहे. त्या ठिकाणी डांबराच्या मिक्सिंग यंत्र संचामुळे प्रदूषण निर्माण होऊन आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत आहे.

गट नंबर 330/1 क्षेत्राच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद सुरू आहे. गटाचा व्यावसायिक कारणासाठी वापर करण्यापूर्वी त्या गटाचे अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे काय? नसेल तर डेव्हलपर्स कंपनीने त्या गटाचा अनाधिकृत वापर कुणाच्या आशिर्वादाने केला आहे? तसेच वेगवेगळे यंत्र संचामुळे प्रदूषण निर्माण होणार आहे. त्यावर काय उपाययोजना केली? याची चौकशी करून विनापरवाना व्यावसायिक कारणासाठी या गटनंबरचा वापर केला. याबाबत दंडात्मक कारवाई तातडीने करून शासनाचा महसूल बुडत असल्याने कारवाई करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे.

यावेळी जिल्हासचिव राजन ब्राह्मणे, तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, उपतालुकाध्यक्ष रमेश पलघडमल, युवक तालुकाध्यक्ष प्रतीक खरात, शहराध्यक्ष प्रतीक रूपटक्के आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com