पालकमंत्र्यांकडून जनता कर्फ्यूची हाक

करोना रोखण्यासाठी गावपातळीवरील दक्षता समित्या || प्रभाग समित्या सक्रिय करण्याच्या सूचना
पालकमंत्र्यांकडून जनता कर्फ्यूची हाक

अहमदनगर|Ahmedagar

जिल्ह्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी 2 आठवडे म्हणजे 14 दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याची हाक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर करोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला. त्याचपद्धतीने किंबहूना अधिक कडकपणे नियमांचे पालन आवश्यक आहे, असे ते पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, आता ग्रामपातळीवरील दक्षता समित्या आणि नागरी भागातील प्रभाग समित्यांनी क्रियाशील होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध लावण्याबाबत जिल्हाधिकारी स्वतंत्रपणे आदेश काढतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शनिवारी जिल्हा दौर्‍यावर होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना स्थितीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. करोनामुळे निर्माण झालेली स्थिती भयावह असल्याचे या बैठकीत त समोर आले.

रुग्णांना बेड नाहीत. रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा आहे. त्यापाठोपाठ आता ऑक्सिजन पुरवठ्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसले. यामुळे पालकमंत्री मुश्रीफ यांनी नगरच्या जनतेलाच ही करोना साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही वस्तूस्थिती आहे. करोना साखळी तोडण्यासाठी जे निर्बंध घातले गेले आहेत ते पुरेसे नाही. यासाठी जनतेने आता जनता कर्फ्यू पुकारला पाहिजे. अत्यावश्यक सेवेसाठी लोक बाहेर पडत आहे याचे दुरगामी परिणाम आपल्याला भोगावे लागतील. सरकारी व खाजगी रूग्णालयांनी रेमडेसिवीर व ऑक्सिजन हे योग्य त्या व्यक्तींना द्यावे, त्याचा अतिरिक्त वापर करू नये, अशा सूचना त्यांनी रूग्णालय प्रमुखांना दिल्या.

रेमडेसिवीरची परिस्थिती पुढील तीन दिवसात सुधारेल. परंतू, ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा भासत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पुढील 14 दिवस नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळावा, पोलिसांना अधिक कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतू जनतेने स्वयंपूर्तीने याला प्रतिसाद द्यावा, असे त्यांनी आवाहन केले. पालकमंत्री यांच्या आवाहनाला जनता कसा प्रतिसाद देते, या काळात कोणत्या सेवा सुरू राहणार याबाबत प्रशासनाकडून काय आदेश निघतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

रिपोर्ट लवकर देण्याच्या सूचना

36 ते 40 तासामध्ये करोना रिपोर्ट दिला तर लोक बाहेर फिरणार नाही. यासंदर्भात लवकर रिपोर्ट देण्याच्या सुचना जिल्हा शल्सचिकित्सकांना दिल्या आहेत. ज्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला त्याने घरामध्ये उपचार न घेता कोव्हिड सेंटरमध्ये दाखल व्हावे, यामुळे घरातील इतरांना याचा संसर्ग होणार नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com