पवारांनी नगरला येऊन काय केले, शेवटी गडकरींनाच फोन केला ना ?

पालकमंत्री विखे यांची बोचरी टीका
आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पालकमंत्री मी असल्याने माझ्यावर टीका करण्याचे काम विरोधकांचे आहे, तसे त्यांना स्वातंत्र्यही आहे. पण इश्यू वा नॉन इश्यू असे काही पाहिले पाहिजे. विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी नगरला येऊन काय केले? शेवटी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाच फोन लावला ना? शिवाय, त्यांनी (गडकरी) त्यांना (पवार) जे सांगितले, तेच गडकरींनी नगरला उड्डाण पुलाच्या उदघाटनाच्या वेळीही सांगितले होते. पण काहींना राजकीय स्टंटबाजी करायची होती, अशी टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली.

नगरमध्ये पालकमंत्री विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पारनेरचे आ. लंके यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातून जाणार्‍या तीन महामार्गांच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. विरोधी पक्ष नेते पवार हे उपोषण सोडवण्यासाठी नगरला आले होते व त्यावेळी त्यांनी नगरमधून केंद्रीय मंत्री गडकरींना फोन लावला होता. त्यानंतर लंके यांचे उपोषण सुटले. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री विखे यांनी आ. लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

काहींना राजकीय स्टंटबाजी करायची असते. माझ्यावर आरोपांचे वा टीकेचे स्वातंत्र्य विरोधकांना आहेच. पण ते उपोषण सोडण्यासाठी आलेल्या पवारांनी येथे येऊन काय केले तर गडकरींनाच फोन लावला ना? आणि गडकरींनी त्यांना त्यावेळी रस्त्यांची कामे सुरू असल्याचे जे सांगितले, तेच गडकरींनी उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्यावेळीही सांगितलेच होते.

दरम्यान, यावेळी मंत्री विखेंनी राहुरीचे आ. प्राजक्त तनपुरे यांच्यावरही टीका केली. राहुरीतील धर्मांतर प्रकरणाची चौकशी सुरू आहे. राहुरी पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. विधीमंडळ सभागृहात विषय झाला आहे. यात अधिकार्‍यांचे खच्चीकरण करण्यासारखा काहीही प्रकार नाही. पण तेथील (राहुरी) महाविकास आघाडीच्या आमदारांना वाटते की, आपली सत्ता गेल्याने आपले खच्चीकरण होत आहे. त्याला आपण काय करणार? असे उपरोधिक भाष्यही विखे यांनी केले.

किल्ला लष्कर मुक्त करणार

नगरचा भुईकोट किल्ला पर्यटनाच्यादृष्टीने खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा किल्ला लष्करमुक्त करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. सैन्यदलासाठी या किल्याचा मालडेपो झाला आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व असल्याने तो पर्यटन विकासाच्यादृष्टीने खुला करण्याचे प्रयत्न आहेत, असे विखे म्हणाले. सिव्हील रुग्णालयात आग दुर्घटनेचा अहवाल विधान भवनाच्या पटलावर ठेवण्याबाबत आरोग्य मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. हा अहवाल जनतेसमोर आणला जाणार आहे. या प्रकरणी कोणी चुकलेले असेल वा कोणी निष्काळजीपणा केला असेल तर शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.

स्वयंशिस्त म्हणून मास्क वापरा

करोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश मोठ्या देवस्थानांमध्ये भाविकांना मास्क सक्ती केली आहे. शासनाने अद्याप तसा निर्णय घेतलेला नाही. पण गर्दीच्या ठिकाणी जाणार्‍या प्रत्येकाने मास्क लावला पाहिजे. नागरिकांनी स्वयंशिस्त म्हणून मास्क वापर सुरू करावा, असे आवाहन करून मंत्री विखे म्हणाले, जिल्हाभरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने रोजगार क्षमता निर्माण करणार्‍या संस्था उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. अशा संस्थांना सरकारद्वारे जमीन व एक खिडकी योजनेतून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी दिल्या जाणार आहेत. रोजगार निर्माण करणे हे आव्हान असल्याने त्यासाठी सर्वांची मदत घेतली जाणार आहे व आवश्यक ती मदत शासनाद्वारे केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तालुकानिहाय रोहित्र बँक उभारा

जिल्ह्यात रोहित्रे उपलब्ध नसल्याने तसेच, ती नादुरुस्त असल्या कारणाने अनेकवेळा ग्रामीण भागातील जनतेला वीज पुरवठा करताना अडचणी येतात. जनतेला योग्य दाबाने व विनाखंडीत वीज पुरवठ्यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय रोहित्रांची बँक उभारण्यात यावी. यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचनाही पालकमंत्री विखे यांनी यावेळी विद्युत विभागाला दिल्या.

जनावारांच्या बाजाराला परवानगी

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व महाराष्ट्र अधिसूचना 17 जून अन्वये प्राप्त अधिकारान्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील कोणताही प्राणी बाजार भरविणे तसेच जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतुक करण्यासाठी अटींसह मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री विखे यांनी दिली.

जिल्हा विकासाची ब्ल्यू प्रिंट

जिल्ह्यात शिर्डी-शनिशिंगणापूरसह अनेक देवस्थाने असल्याने धार्मिक पर्यटन, रतनगड-हरिश्चंद्रगड-भंडारदरा व सह्याद्रीच्या रांगा असल्याने अ‍ॅडव्हेंचर पर्यटन आणि औद्योगिक वसाहतींतील मोकळे भूखंड व बंद पडलेले कारखाने आणि या वसाहतींजवळील शासकीय भूखंडांवर आयटी पार्क व अन्य औद्योगिक कंपन्यांच्या निर्मितीचा प्रयत्न आहे. यासाठी राज्याच्या गुंतवणूक व आयटी कन्सल्टन्सीच्या मदतीने जिल्ह्याचे प्रकल्प अहवाल तयार केले जाणार आहेत. जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग, सूरत-चेन्नई महामार्ग, कल्याण-विशाखापट्टणम महामार्ग, नवा औरंगाबाद-पुणे व मालेगाव-करमाळा महामार्ग जात असल्याने जिल्ह्याची रोड कनेक्टीव्हीटी वाढणार आहे. शिर्डी विमानतळावर 300 कोटींची नवी इमारतही होत आहे. अशा स्थितीत पर्यटन वाढीसह जिल्हा विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली जाईल. यातून रोजगार निर्मितीला चालना दिली जाईल, असेही मंत्री विखेंनी सांगितले. स्वप्न दाखवत नाही तर प्रत्यक्ष कृती करण्यावर माझा भर असतो, असा दावाही त्यांनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com