शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानने साईमंदिरात दर्शनासाठी येताना लज्जा उत्पन्न होईल असे तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन केले असून

भारतीय संस्कृतीमध्ये चांगले कपडे परिधान करून दर्शनास यावे या भावनेने संस्थानने फलक लिहिले आहेत. कोणावर सक्ती केली नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे प्रत्येकास जीवन जगण्याचा अधिकार आहे.

त्यामुळे दर्शनासाठी येणार्याला तो अधिकार असून याठिकाणी संबंधित प्रश्नी गैरसमज न करता आपले पावित्र्य टिकावे या भावनेने त्यांनी आवाहन केले आहे. कोणावर सक्ती नाही, हे ऐच्छिक असून याचे सर्वांनी अनुकरण करावे, असे मत ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी साईदरबारी हजेरी लावत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, रा.यु.काँ.चे दीपक गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना. मुश्रीफ यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ना. मुश्रीफ म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर मला साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. काही दिवसांपूर्वी मी शिर्डीत येऊन गेलो मात्र मंदिर बंद असल्याने दर्शन घेता आले नाही.

परंतु आज दर्शनाला आलो असून अत्यंत आनंद झाला आहे. जगावर आलेले करोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे आणि आपले जीवन, गतवैभव सर्वांना प्राप्त होऊ द्या अशी साईबाबांना प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान दीपावलीनंतर राज्यातील सर्व धार्मिक तीर्थक्षेत्र राज्य शासनाने सुरू केली आहेत. साईमंदिरात देखील अतिशय सुंदर नियोजन केल्यामुळे आजपर्यंत एकाही भाविकास तसेच सेवेकर्याला करोनाची बाधा झाली नाही. या संस्थानच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.