अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा नियोजनमधून पोलिसांना दिलेली 20 वाहने व ई-टपाल सुविधा यामुळे पोलिसांचे काम गतिमान होईल, त्याचबरोबर वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.

तसेच शिर्डी येथे सुरू करण्यात आलेल्या श्री साई तीर्थक्षेत्र (पर्यटन) पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षा आणि सुविधा मिळतील, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

पोलीस मुख्यालय मैदानावर मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या 20 वाहनांचा ताफ्याचा पोलीस दलात समावेश, श्री साई तीर्थक्षेत्र (पर्यटन) पोलीस मदत केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून पोलीस दलाच्या कामकाजासाठी मिळालेली ई-सामग्री प्रदान कार्यक्रम पालकमंत्री मुश्रीफ यांच्याहस्ते झाला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, सौरभ अग्रवाल आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्हा नियोजनच्या निधीमधून पोलीस दल सक्षमीकरणासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, पर्यटकांना योग्य ती माहिती आणि सुविधा पुरवल्या तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने योग्य ती काळजी घेतली तर जिल्हा विकासाला गती मिळेल, असे मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार रोहित पवार म्हणाले, ई-टपाल सुविधांचा वापर केल्यास वेळ आणि खर्चात बचत होण्याबरोबरच उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करता येणार आहे तसेच कामकाज अधिक गतीने करता येणार आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर म्हणाले, पोलीसांची बांधिलकी ही सर्वसामान्यांशी असून सुविधा मिळाल्यामुळे गतिमान कामकाज शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.