करोना रोखण्यासाठी शंभर दिवसांचा आराखडा तयार करा
सार्वमत

करोना रोखण्यासाठी शंभर दिवसांचा आराखडा तयार करा

पालकमंत्री मुश्रीफ : बाधित रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी चाचण्या वाढविणार

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अधिकाधिक चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी प्रशासनाने भर द्यावा. येत्या शंभर दिवसांसाठी नियोजन करून करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या

पालकमंत्री मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात करोनाविषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खा. सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, मोनिका राजळे, डॉ. किरण लहामटे, रोहित पवार, लहू कानडे, आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखर्णा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुश्रीफ आणि महसूलमंत्री थोरात यांनी करोनाविषयक परिस्थितीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून जाणून घेतला. जिल्हाधिकारी द्विवेदी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे यांनी सादरीकरणाद्वारे उपाययोजनांसंदर्भातील प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविली आहे.

त्यामुळे बाधित संख्या वाढते आहे. मात्र, बाधित रुग्ण शोधण्यासाठी ही मोहिम अधिक गतीमान करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या यापुढील काळात वाढवावी, अनेक रुग्णांच्या बेड्स मिळत नसल्याबाबतच्या तक्रारींचा उल्लेख करून पालकमंत्री म्हणाले की, ज्या बाधित रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, त्यांनी कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे लक्षणे जाणवणार्‍या आणि ऑक्सीजन अथवा व्हेंटिलेटरची आवश्यकता असणार्‍या रुग्णांना कोव्हिड हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होऊ शकतील.महसूलमंत्री थोरात म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनाच्या सोबत आहेत. सर्वंकष नियोजन करुन आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी आ. जगताप यांनी महापालिका क्षेत्रासाठी अधिक आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आ. लहामटे यांनी दुर्गम भागात अधिक आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत विचार व्हावा, तर आ. राजळे यांनी तालुकास्तरावर ऑक्सीजन पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत.

आ. कानडे यांनी श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयासाठी सुविधा वाढविण्याची मागणी केली. आ. काळे यांनीही कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सुविधा निर्माण केल्या तर येथील जिल्हा रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी होईल, असे सांगितले. आ. पाचपुते यांनी प्रशासन अधिक सतर्कतेने काम करीत आहे, पुढील काळात तालुका पातळीवरही ऑक्सीजन बेड्स उपलब्ध असतील, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली.

आ. पवार यांनी काही रुग्णालये रुग्णांकडून जास्त शुल्क आकारत असल्याच्या आणि त्याची पावती देत नसल्याची तक्रार केली. अशा रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी त्यांनी केली. यावर, महापालिका क्षेत्रात सहायक आयुक्त आणि तालुकास्तरावर सहायक कोषागार अधिकारी यांचे पथक तयार केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com