आरोग्य सुविधांसाठी नियोजन समितीचा 30 टक्के निधी वापरणार

पालकमंत्री मुश्रीफ : पारनेर आणि श्रीगोंद्यात करोनाचा आढावा
आरोग्य सुविधांसाठी नियोजन समितीचा 30 टक्के निधी वापरणार

पारनेर/श्रीगोंंदा |प्रतिनिधी| Parner

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसर्‍या लाटेने आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास भाग पाडले. जिल्ह्यात सध्या परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी करोना उपाययोजनांसाठी खर्च कऱण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी भाळवणी (ता. पारनेर) येथील शरद पवार कोविड केअर सेंटर भेट देऊन पाहणी केली. तसेच पारनेर तालुक्याचा आणि त्यानंतर श्रीगोंदा येथे श्रीगोंदा तालुक्यातील करोना परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. भाळवणी येथील कार्यक्रमास आ. निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, तर श्रीगोंदा येथील कार्यक्रमास आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

भाळवणी पारनेर तालुक्याचा आढावा घेतल्यानंतर त्यानंतर त्यांनी श्रीगोंदा येथे तालुका आढावा बैठक घेऊन प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. मात्र, तिसर्‍या लाटेची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. यापुढील काळातही अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. पहिली लाट ओसरल्यावर आपण काहीसे निर्धास्त झालो. ठिकठिकाणी लग्नसोहळे, विविध समारंभ झाले. त्यामुळे दुसर्‍या लाटेत त्याचा गंभीर फटका आपल्याला बसला. संभाव्या तिसरी लाट लक्षात घेऊन आणि पहिल्या व दुसर्‍या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन आता प्रशासन म्हणून आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण सर्वांनी तयार राहिले पाहिज.

जिल्ह्यात त्यादृष्टीने ऑक्सीजन उपलब्धता, ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था, औषधसाठा उपलब्धता याचे नियोजन आणि तयारी आतापासूनच केली जात आहे. पारनेर आणि श्रीगोंदा तालुका आढावा बैठकीत त्यांनी दोन्ही तालुक्यांतील विविध अडचणी समजावून घेतल्या. जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्यात आल्यामुळे रुग्णांमार्फत होणारा संसर्ग थांबेल आणि ही साखळी तोडण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पारनेरमध्ये आ. लंके यांनी तालुक्यातील परिस्थितीची कल्पना दिली. तर श्रीगोंदा येथील बैठकीत आमदार पाचपुते, शेलार यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी तालुक्यातील करोना रोखण्यासाठी अधिक गंभीरपणे उपाययोजना करण्याची गरज प्रतिपादित केली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांच्या साह्याने करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानची मोठी मदत आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांवर असलेला ताण मोठ्या प्रमाणात हलका होणार आहे. जिल्ह्यात 14 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरच सुरु होणार आहेत. याशिवाय, राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठीचा ऑक्सिजन पुरवठा वाढवून आणाला आहे. यापुढील काळात जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्र शासनाकडून पुरेसा लसपुरवठा व्हावा, यासाटी राज्य शासन पाठपुरावा करत आहे. येत्या सहा महिन्यांत किमान 80 टक्के लसीकरण पूर्ण व्हावे, असे सरकारचे प्रयत्न असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या करोनाबरोबरच आता राज्यात म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून येत आहेत. आपल्या जिल्ह्यातही 173 रुग्ण आढळले आहेत. त्यासाठी आवश्यक इंजेक्शन्स सध्या जिल्ह्यात उपलब्ध असले तरी अधिकची गरज लागणार आहे. त्यादृष्टीने ती मिळविण्यासाटी प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com