अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे.

जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा आणि नागरिक यांनी आता पुढाकार घेऊन करोनाला हरवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.

या मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे रुग्णांची संख्या वाढणार असली तरी त्यामुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतील, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी अधिक गांभीर्याने आरोग्यविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे करोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त अशोक राठोड, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी, सध्या जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या, रुग्णालयांना आवश्यक ऑक्सिजन पुरवठा, जिल्ह्यातील औषधपुरवठा, रुग्णालयातील उपलब्ध बेड्सची संख्या आदींची माहिती घेतली. जिल्ह्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास 85 टक्के इतके आहे.

राज्याच्या तुलनेत सरासरी हे प्रमाण जास्त आहे. सध्या जिल्ह्यात 4 हजार 333 रुग्ण उपचार घेत आहेत. करोना रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. नागरिकांनीही आजार अंगावर न काढता वेळीच लक्षणे जाणवल्यास उपचार घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम 25 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच चाचण्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तरी त्यांच्यावरील उपचारासाठी पुरेशी व्यवस्था प्रशासन आणि आरोग्य विभागाने केली असल्याची माहिती मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

नगरपालिका अथवा महानगरपालिका क्षेत्रात विविध डॉक्टरांनी एकत्र येऊन त्यांची सेवा रुग्णांसाठी किफायतशीर दरात उपलब्ध करून दिल्यास प्रशासनही त्यांना त्यासाठी लागणार्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देईल, असे ते म्हणाले.

के. के. रेंजप्रश्नी जनतेसोबत

जिल्ह्यातील प्रश्नांच्या संदर्भात पालकमंत्री म्हणून आपली वेगळी भूमिका नाही, तर जी जनतेची भावना आहे, त्या भावनेसोबत आपण आहोत, असे त्यांनी के. के. रेंज जमीन संपादन प्रकरणी प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.