शहरच नव्हे तर जिल्हा लॉकडाऊन करा
सार्वमत

शहरच नव्हे तर जिल्हा लॉकडाऊन करा

आ. संग्राम जगताप । पालकमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत नोंदविलं मत

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

नगर जिल्ह्यात महापालिका व संगमनेर शहरात करोनाचा मोठा प्रादूर्भाव असल्याची माहिती कलेक्टरांनी मांडल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील आमदारांकडून करोनाच्या स्थितीबाबत मते जाणून घेतली. त्यात नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी लॉकडाऊनची परिस्थिती नाही, मात्र वेळ आलीच तर नुसते शहरच नको तर जिल्हा लॉकडाऊन करावा असं म्हणणं मांडलं. त्याचा कालावधीही 25 दिवसाचा करावा असे ते म्हणाले.

जिल्ह्यात करोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन बैठकीतून आज जिल्ह्याचा आढावा घेतला. सुरूवातीला कलेक्टरांनी जिल्ह्याची परिस्थिती मांडली. करोनाच्या संसर्गाशी लढण्यासाठी प्रशासनाची तयारी त्यांनी बैठकीत सांगितली. त्यानंतर आमदारांची मते जाणून घेण्यात आली.

नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरात करोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याचे सांगतानाच सिव्हील हॉस्पिटलमधील व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे शहरात विकास कामे रखडल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

कलेक्टरांनी मांडल्या आकडेवारीनंतर लॉकडाऊन संदर्भात बोलताना आ. जगताप म्हणाले, नगर शहरात जिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊन फक्त नगर शहरात करून चालणार नाही तर संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन केला जावा. त्याचा कालावधी 25 दिवसाचा आसावा.

आ. जगताप यांनी सिव्हीलमधील सुविधा व महापालिकेच्या व्यवस्थेवर बैठकीत नाराजी व्यक्त केली. सिव्हीलमध्ये गलिच्छपणा असून भोजन व्यवस्था चांगली नसल्याचे ते म्हणाले. शहरातील विकास कामे खोळंबली असून त्याला प्रशासन जबाबदार आहे. वर्क ऑर्डर झालेली कामेही सुरू होत नाही. अधिकारी एकमेकांवर जबाबादरी ढकलतात, असा मुद्दा मांडत आ. जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी आयुक्त मायकलवार यांना याबाबत विचारणा केली. कोरोना लढाईत 200 कर्मचारी गुंतले आहेत. प्रलंबित कामाची माहिती घेतली असून अधिकार्‍यांना मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यापुढे अशी तक्रार येणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे उत्तर आयुक्तांनी दिले.

लॉकडाऊन करा किंवा करू नका अशी दोन्ही मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र आता लॉकडाऊन करताना सगळ्या गोष्टींचा विचार करणे भाग आहे. नाही केल्यास कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. संगमनेरमध्ये सामाजिक संघटनांना सोबत घेऊन काम सुरू केले आहे. संगमनेरमध्ये कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, अशी तक्रार मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठकीत मांडली.

Deshdoot
www.deshdoot.com