हजाराच्या लाचेसाठी जीएसटी अधिक्षकासह निरीक्षकही जेरबंद

सीबीआयच्या अँटी करप्शन ब्युरोची कारवाई
Bribe
Bribe

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नोंदणी प्रमाणपत्राचा अर्ज मंजूर करण्यासाठी अधिकार्‍यांकडून एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. अर्जदाराने थेट सीबीआयच्या अँटी करप्शन ब्युरोकडे याची तक्रार केली. सीबीआयनेही तत्काळ दखल घेत दोन दिवसांत सापळा रचून कारवाई केली. नगर येथील वस्तू व सेवा कर अधिक्षकांसह निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, एक हजार रुपयांच्या लाच प्रकरणात थेट जीएसटी अधीक्षक जेरबंद झाल्याने खळबळ उडाली आहे.

अधीक्षक विजयकुमार राऊत (वय 55, रा. राहिंजमळा, केडगाव, नगर) व निरीक्षक मुरली मनोहर (वय 27, रा. अमितनगर, नगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता जिल्हा न्यायाधीश एस. गोसावी यांनी दोघांनाही 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सीबीआयचे वकील डी. एन. म्हस्के यांनी दिली.

नगर येथील एका खाद्यतेल व्यावसायिकाला नव्या कंपनीची एजन्सी घ्यायची असल्याने त्यांनी 13 डिसेंबरला जीएसटी पोर्टलवर अर्ज केला होता. त्यानंतर 2 जानेवारीला निरीक्षक मुरली मनोहर याने त्यांना फोन करून मार्केटयार्ड येथील किसान क्रांतीमधील कार्यालयात बोलावले. अर्जदाराने त्याच दिवशी कार्यालयात जाऊन त्याची भेट घेतली. निरीक्षक मुरली मनोहर याने अर्जदाराची ओळख अधीक्षक विजयकुमार राऊत याच्याशी करून दिली.

अर्जदाराने अर्जासमवेत जोडलेले वीजबिल त्याच्या वडिलांच्या नावे असल्याने अर्ज नामंजूर होईल, असे या दोघांनी त्यांना सांगितले. एक हजार रूपये दिल्यास अर्ज मंजूर करू, असे म्हणत त्या दोघांनी लाचेची मागणी केली. अर्जदाराने त्याच दिवशी सीबीआयच्या अँटी करप्शन ब्यूरोकडे तक्रार केली. सीबीआयने या एक हजार रूपये लाचेची तत्काळ दाखल घेत सापळा रचला. अधीक्षक राऊत यांनी लाचेची मागणी करत सदर रक्कम निरीक्षकाला देण्यास सांगितले. अर्जदाराने लाचेची रक्कम निरीक्षकाला देताच सीबीआयच्या अँटी करप्शन ब्युरोच्या निरीक्षक शीतल शेंडगे यांच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. या दोघांचीही पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com