जीएसटी 12 वरून 18 टक्के केल्यामुळे महागाई वाढणार

जीएसटी 12 वरून 18 टक्के केल्यामुळे महागाई वाढणार

लोहगाव |वार्ताहर| Lohgav

आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना सामान्यांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे. आज 18 जुलैपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून या वाढीला विरोध होत असून महिला वर्गातून तर हा जीएसटीचा वाढलेला कर त्वरित रद्द करावा, अशी मागणी होत आहे.

नव्या जीएसटी दरानुसार, खाणं-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. त्यामुळे महागाई आणखी रडवणार आहे. अन्नधान्यांवरही जीएसटी लागू होणार आहे. धान्य आणि डाळीच्या किंमतीत 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे व्यापार्‍यांनी म्हटले. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही या जीएसटी वाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. शनिवारी व्यापार्‍यांनी बंद पुकारला होता. त्याच्या परिणामी बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प होते.

पाकिट बंद आणि लेबल असलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. यामध्ये मासे, टेट्रा पॅकमधील दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत हे पदार्थ जीएसटीबाहेर होते. त्याशिवाय बँकेकडून जारी करण्यात येणार्‍या धनादेश सेवांवर 18 टक्के आणि एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. एक हजार रुपयांपेक्षा प्रति दिवस भाडे असणार्‍या हॉटेल रुम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. एलईडी लाइट्स आणि लॅम्पच्या किंमतीदेखील वाढवण्याची शक्यता आहे. सरकारने या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर केली आहे.

सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे. तसेच बियाणे साफ करण्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मशीनवर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. सोलर वॉटर हिटर्सवरही 12 टक्के कर आकारण्यात येणार आहे. याआधी पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.

रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, जैव-वैद्यकीय कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणार्‍या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. या सर्व जीएसटी करवाढीमुळे वस्तूंचे भावही वाढणार आहे. गेले दोन अडीच वर्षे करोनामुळे ग्रामीण भागात काम धंदा व्यवसाय नसल्यामुळे आर्थिक व्यवहारिक ठप्प झाले होते. आता कुठेतरी आर्थिक व्यवहार सुरळीत होत असतानाच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तेव्हा हा जीएसटी वाढलेला कर पूर्वीप्रमाणे कमी करावा, अशी मागणी राहाता तालुक्यातूनही होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com