राहुरीतील ‘ग्रीनफिल्ड’ प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे ना. तनपुरेंना साकडे

भूसंपादनात शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न - ना. तनपुरे यांचे आश्वासन
राहुरीतील ‘ग्रीनफिल्ड’ प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे ना. तनपुरेंना साकडे

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

सुरत- हैदराबाद महामार्गातील भूसंपादनाबाबत राहुरी शहरातील प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. मंत्री तनपुरे यांनी आपण शेतकर्‍यांच्या बरोबर असून योग्य तो मोबदला देण्यासाठी अधिकाधिक स्तरावर प्रयत्न करू, असे शेतकर्‍यांना आश्वासन दिले.

ग्रीनफिल्ड हायवेमध्ये राहुरी नगरपालिका हद्दीतील शहराच्या पश्चिमेकडील सुमारे 36 गट व सर्वेमधून हा मार्ग जाणार आहे. जवळपास शहरातील 5 किलोमीटर अंतर हायवेमध्ये असणार आहे. तालुक्यातील 19 गावातून 44 किलोमीटर मधील 428 हेक्टर शेतजमीन यात जात आहे.

कैफियत मांडताना शेतकरी म्हणाले, राहुरी शहरातील मोठा बागायत भाग यात जाणार आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. हायवेलगत सर्विस रोडही निश्चित नाही. ओढे, नाले व पावसाचे पाणी साचून शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे. मागील काही वर्षात या भागातील क्वचितच जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार झाल्याने हा दर गृहीत न धरता सध्याच्या जमिनींच्या बाजारभावाच्या दराप्रमाणे मोबदला गृहीत धरावा. बागायती व शहरी भाग असल्याने बाजारमूल्य अधिक आहे. ज्यांचे मोठे क्षेत्र जाणार आहे, त्यांच्याशी पूर्ण चर्चा करूनच निर्णय घ्यावा.

आत्तापर्यंत सर्व संपादित केलेल्या जमिनींना गुणक 2 वापरण्यात आलेला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व नगर-सोलापूर महामार्ग, हे दोन्ही महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जात आहेत. या दोन्ही महामार्गाकरीता संपादित करण्यात आलेल्या जमिनींना गुणक 2 प्रमाणे वापर झालेला आहे. सुरत- हैद्राबाद महामार्गाला या दोन महामार्गांप्रमाणेच गुणक 2 वापरावा, अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

ना. तनपुरे म्हणाले, गुणक 2 चा नियम या रस्त्याला लागू आहे. ज्या शेतकर्‍यांचे मोठे क्षेत्र जात आहे, त्यांना प्रकल्पाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून न्याय दिला जाईल. राहुरी तालुक्यातील सर्वाधिक गावे या हायवेत जाणार असल्याने आपण यात जातीने लक्ष घालून प्रकल्प अधिकार्‍यांशी पुन्हा एकदा सखोल चर्चा करू, असे आश्वासित केले. या चर्चेत अविनाश तोडमल, बापूसाहेब वराळे, प्रसाद मैड, जबीर शेख, नंदू वराळे, कृष्णा मैड, देवराव येवले, अशोक तोडमल आदी शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांना निवेदन देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com