
उंबरे |वार्ताहर| Umbare
सुरत-हैद्राबाद या महामार्गासाठी जमीन संपादनाची कायदेशीर प्रक्रिया सुरू करताना संबंधित गावच्या ग्रामसभेत लाभार्थी शेतकर्यांचे मत विचारात घ्यावे, त्या गावाने दर घोषित केल्यानंतर त्याची ग्रामसभेकडून मान्यता घ्यावी, शेतीचा खरेदी रेडीरेकनर दर पाच-दहापटींनी वाढवावा, अगोदर शिवार रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, जमिनीची नोंद बागायती म्हणून व्हावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत खा. डॉ. सुजय विखे होते.
निवेदनात म्हटले, शासनाने योग्य मोबदला जाहीर करून शेतकर्यांच्या संमतीखेरीज कोणतीही भूसंपादन प्रक्रिया करू नये, जमीन विभाजनाच्या ठिकाणी अंडरपास टाकावे, यापूर्वीही पात्र शेतकर्यांनी याबाबत निवेदन दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे कर्डिले यांनी सांगितले. महामार्गाची घोषणा झाल्यानंतर दि. 10 डिसेंबर 2018 रोजी निवेदनानुसार या महामार्गास विरोध दर्शविला असून शासनाने या निवेदनाकडे दुर्लक्ष केले आहे.
महामार्गाची आखणी करताना शेतकर्यांबरोबर चर्चा करावी, सध्याचे खरेदी दर व शासकीय दरबारी असलेले दर यात मोठी तफावत असल्याने शेतकर्यांना विचारात घेऊनच मोबदला जाहीर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा, महामार्गामुळे शेतकर्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.
सुरत-हैद्राबाद हा ग्रीनफिल्ड महामार्ग नगर जिल्ह्यातील 49 गावांतून जात आहे. त्यासाठी सुमारे 1250 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या महामार्गापासून शेतकर्यांना मिळणारा मोबदला व अन्य अधिग्रहण प्रक्रिया याबाबत अनेक मुद्दे कर्डिले यांनी ना. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. या महामार्गातील भूसंपादनाबाबत पात्र शेतकर्यांमध्ये साशंकता असून शेतकर्यांनी विखे व कर्डिले यांच्याकडे धाव घेऊन त्यांना साकडे घातले. त्यावर विखे व कर्डिले यांनी राहुरी विद्यापीठात दीक्षांत पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या ना.गडकरी यांची शेतकर्यांसमवेत तातडीने भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.