ढगाळ वातावरणाने तालुक्यातील द्राक्षे, गहू, हरभरा, बोरे अडचणीत!

ढगाळ वातावरणाने तालुक्यातील द्राक्षे, गहू, हरभरा, बोरे अडचणीत!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गेल्या चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उभ्या पिकांना रोगांचा प्रादूर्भाव जाणवू लागल्याने शेतकर्‍यांना मोठा अर्थिक भुर्दंड बसत आहे.

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षे, गहू, हरभरा, बोर, तसेच कांद्याच्या पिकांना याचे परिणाम दिसू लागले आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये द्राक्ष पिकांची छाटणी होते. यातच काही ठिकाणी बागांमधील वेलीवर द्राक्षांचे घड दिसू लागले आहेत. काही बागांमध्ये चांगले घड दिसत आहेत. परंतु या ढगाळ वातावरणामुळे लगडलेले घड जिरतात, तसेच त्यांची बाळी तयार होत असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक संजय निरगुडे व विजय निरगुडे यांनी दिली. या बागांवर थ्रिप्स दिसून येत आहेत. लहान लहान किटक दिसू लागल्याने किटकनाशक मारण्यावाचून शेतकर्‍यांकडे पर्याय नाही.

किटकनाशके आणि बुरशीनाशकांचा खर्च वाढणार असल्याने मोठा अर्थिक फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. द्राक्षांचे घड जिरू नयेत म्हणून पोषक मारावे लागणार असल्याने तोही खर्च वाढणार आहे. राहाता तालुक्यात पिंपळस, साकुरी, अस्तगाव, भागात तसेच प्रवरा परिसरात काही गावांत द्राक्षांच्या बागा उभ्या आहेत. गहू पिकावर या वातावरणामुळे मावा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उगवून आलेल्या हरभर्‍यावर अळीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. हरभर्‍याचे क्षेत्रही यावर्षी वाढले आहे.

तालुक्यात कांद्याच्या लागवडी वाढल्या आहेत. याशिवाय कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात असल्याने अशा वातावरणात या कांद्यांवर तसेच रोपांवर करप्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कांद्याच्या लागवडी सध्या तालुक्यात सुरू आहेत. यामुळे रोपांना तसेच कांद्याला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अ‍ॅपल बो ही यावर्षी पहिल्यांदाच अडचणीत आले आहे. अस्तगाव, राहाता, पिंपळस आदी भागात अ‍ॅपल बोराच्या बागा आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पेरू वर दिसणारी जैवीक बुरशी यंदा पहिल्यांदाच अ‍ॅपल बोरावर दिसली असल्याचे पिंपळस येथील बोर उत्पादक शेतकरी प्रकाश पुंड यांनी सांगितले. बोरावर काळा चॉकलेटी डाग दिसून येतो. हा डाग आला की ते नवजात बोर वाया जाते. बॅक्टोसेल दिसून आल्यास औषध फवारणी करुनही तो कंट्रोल होत नाही. हवेत जास्त आर्द्रता असेल तर या रोगाची चिन्हे दिसतात, असे पुंड म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com