शेततळ्यात बुडून आजोबा-नातवाचा मृत्यू

गर्दनी शिवारातील घटना
शेततळ्यात बुडून आजोबा-नातवाचा मृत्यू

अकोले (प्रतिनिधी) -

शेततळ्यात बुडून एका शेतकर्‍याचा व एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गर्दनी शिवारात वीरगाव घाटाजवळ

घडली. काही दिवसांपूर्वी वीरगाव येथेही बाप- लेकीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बबन भिकाजी नाईकवाडी (वय 50, रा. गर्दनी, ता. अकोले) व आरुष राहुल वामन (वय 7 वर्ष, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. यातील मयत मुलगा आरुष हा बबन नाईकवाडी यांच्या साडू च्या मुलीचा मुलगा आहे.

नात्याने नातू हा आजोबा बबन नाईकवाडी यांच्या कडे लॉक डाऊन मुळे शाळेला सुट्टी असल्यामुळे आला होता. नाईकवाडी यांचे गर्दनी शिवारात डोंगराच्या कडेला शेत आहे. तेथे कांदा काढण्याचे काम सुरू होते.त्यावेळी आरुष हा लगतच असलेल्या भाऊसाहेब दामोदर नाईकवाडी यांच्या मालकीच्या शेततळ्यात गुरुवारी दुपारी 4 ते 4.15 वाजे च्या सुमारास आंघोळी साठी गेला होता.

आरुष हा पाण्यात बुडत असल्याचे पाहून बबन नाईकवाडी हे त्याला वाचवण्यासाठी शेततळ्यात उतरले. या घटनेत दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला. डोंगराच्या कडेला असणार्‍या शेततळ्यात ही घटना घडल्याने लवकर कुणाच्याही लक्षात आले नाही. सायंकाळी साडे पाच वाजेच्या वेळेस भाऊसाहेब नाईकवाडी हे शेततळ्याकडे गेले असता त्यांना हे दोघे शेततळ्यात बुडाल्याचे दिसले.नंतर त्या दोघांचे ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री बबन नाईकवाडी यांचे वर गर्दनी येथे तर आरुष वर कोल्हेवाडी या त्याच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर भास्कर नाईकवाडी यांच्या खबरी वरून अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत बबन नाईकवाडी हे हरिभाऊ नाईकवाडी यांचे बंधू तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी यांचे चुलत भाऊ होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, भाऊ, भावजया, नातवंडे असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com