अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील 1 हजार 318 ग्रामपंचायतींपैकी 20 टक्के ग्रामपंचायतींना ग्रामसेवक नाहीत. जिल्ह्यात 96 ग्रामसेवक व 37 ग्रामविकास

अधिकारी अशी एकूण 133 पदे रिक्त असल्याने गावकारभारावर परिणाम होत आहे. तर एकाच अधिकार्यांकडे वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा पदभार असल्याने ते ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी त्रस्त झाले आहेत.

पंचायत राज्य व्यस्थेत गावाच्या विकासात ग्रामसेवक हे महत्वाचे पद असून केंद्र, राज्य यासह जिल्हा परिषदांकडून येणार्या निधीचे नियोजन, खर्चाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवक यांच्या खांद्यावर आहे. ग्रामपंचायतमधील सर्वप्रकारचे अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे, विविध शासकीय योजना राबवणे, आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्ययावत ठेवणे, ग्रामसभा, मासिक सभा बोलविणे, त्यांच्या नोटिसा काढून संबंधितांना देणे, शासनाने व जिल्हा परषिदेने बसविलेले विविध कर वसूल करणे, ग्रामपंचायत हद्दीतील जमीन, रस्ते, इमारती, पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्ययावत ठेवणे, जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी करणे अशी अनेक कामे ग्रामसेवकांना करावी लागतात. ग्रामस्थांना लागणारे विविध दाखले देण्यापासून ते विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांना ग्रामसेवकावर अवलंबून राहावे लागते.

जिल्ह्यात 1 हजार 318 ग्रामपंचायती असून त्यातील 856 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक आहेत, तर 3 हजार लोकसंख्येच्या पुढील गावांसाठी 216 ग्रामविकास अधिकारी नियुक्त आहेत. शिवाय 16 ग्रामसेवक कंत्राटी आहेत. त्यामुळे एकाच ग्रामसेवकाला दोन किंवा तीन गावांचा कारभार पहावा लागतो. ग्रामसेवकांसाठी हे अतिरिक्त काम आहेच, परंतु त्याहीपेक्षा ग्रामसेवकांअभावी ग्रामस्थांच्या कामांचा खोळंबा अधिक आहे. सद्या जिल्ह्यात 20 टक्के गावांत ग्रामसेवक नाहीत. त्यामुळे उर्वरित पदे तातडीने भरावीत, अशी मागणी गावांतून होत आहे. 2018 नंतर ग्रामसेवक भरती झालेली नाही.

ग्रामसेवकांची भरती हा राज्य सरकार पातळीवरील विषय असून वारंवार मागणी करूनही राज्य सरकार ग्रामसेवकांची भरती करत नाही. यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये योजनांची अंमलबजावणी करतांना अडचणी येत आहेत.यामुळे राज्य सरकारने ग्रामसेवकांची भरती करण्याची मागणी होत आहे.