ग्रामसेवक आत्महत्या प्रकरणी उपसरपंचावर गुन्हा

तब्बल आठ दिवसांनी आढळला मृतदेह
ग्रामसेवक आत्महत्या प्रकरणी उपसरपंचावर गुन्हा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील खांडगाव - वडघुल या ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा (जिल्हा बीड) धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी वलघुड-खांडगाव गावचे उपसरपंच राम घोडके व आनंदा शिंदे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्बल आठ दिवसांनी शनिवारी (दि.2) दुपारी झुंबर गवांदे यांचा मृतदेह आढळून आला. बीड तालुक्यातील सौताडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र खांडगाव - वडघुलचे उपसरपंच राम घोडके यांच्या त्रासाला कंटाळून पती गवांदे यांनी आत्महत्या केल्याचा ग्रामसेवक यांच्या पत्नी मनीषा गवांदे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार गेल्या वीस दिवसांपासून उपसरपंच राम घोडके व ग्रामपंचायत सदस्या सुनंदा शिंदे यांचा मुलगा आनंदा शिंदे हे दोघे मिळून वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या 150 घरांची नोंद लावण्यासाठी जबरदस्तीने ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्यावर दबाव आणत होते व आमच्या पद्धतीने कामकाज करा अन्यथा तुमची नोकरी घालवून निलंबित करून पेन्शन सुविधा बंद करण्याची धमकी दिली होती. या सर्व त्रासाला कंटाळून ग्रामसेवक गवांदे यांनी आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.